मुक्तपीठ टीम
मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत, गरुड एरोस्पेस ही स्टार्टअप कंपनी कृषी क्षेत्रासाठी १००० ड्रोन तयार करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लॉन्चिंग होऊ शकते. शेतकऱ्यांना कृषी उत्पादकता आणि नफा दोन्ही अनुकूल करण्यात मदत करण्यासाठी ड्रोन खूप फायदेशीर ठरू शकतात. शेतकऱ्यांना याची मदत मिळणार आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवर कीटकनाशके, पाणी, खते फवारण्यास मदत करून वेळ, पाणी, संसाधने वाचवण्यासाठी आणि कृषी उद्योगाला चालना देणे हा गरुड एरोस्पेस स्टार्टअपचा उद्देश आहे. गरुड एरोस्पेसचे उपाध्यक्ष राम कुमार म्हणाले, “आमच्या कंपनीचे संस्थापक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आणि त्यांना पुढील महिन्यात १००० ड्रोन बनवण्याच्या आमच्या योजनेबद्दल माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी या ड्रोनच्या मदतीने कार्यक्रम सुरू करण्यास सहमती दर्शवली. ड्रोन वेळ, पाणी आणि योग्य संसाधने वाचवू शकतात.
कंपनीचे उपाध्यक्ष म्हणाले, या ड्रोनच्या मदतीने आपण शेतात फवारणी करू शकतो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी ३ ते ४ तास लागायचे, तिथे या ड्रोनच्या मदतीने ते फवारणी करू शकतात. शेतकरी फक्त १० मिनिटांत त्यांच्या शेतात फवारणी करू शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पाणी आणि संसाधनांची बचत होणार आहे.
विशेष म्हणजे, ड्रोनच्या वापरामुळे पिकांचे वेळेवर कीटकांपासून संरक्षण होईल, पिकांच्या काळजीसाठी, संगोपणासाठी लागणारा वेळ वाचेल, कृषी उत्पादनाचा एकूण खर्च कमी होईल आणि उच्च उत्पादन आणि दर्जेदार पिके सुरक्षित होतील.