मुक्तपीठ टीम
शिवसेनेनं मुंबईबाहेर लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. दादरा नगर हवेलीत झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांचे पती मोहन डेलकर हे या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून गेले होते. भाजपा नेत्यांवर जाचाचा आरोप करत त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर पोलीस तपास पुढे गेलाच नाही. पण त्यामुळे तिथं झालेल्या पोटनिवडणुकीआधी कलाबेन मोहन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. या पोटनिवडणुकीत विजय मिळवून त्यांनी आपल्या पतीच्या मृत्यूचा एकप्रकारे सूड उगवल्याचे म्हटले जाते.
दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक निकाल
- शिवसेना कलाबेन मोहन डेलकर- १,१६,८३४
- भाजपा महेश गावित-६६,१५७
- काँग्रेस महेश धोदी-६,०६०
(निवडणूक आयोगाची अंतिम आकडेवारी येणे बाकी)
याआधी शिवसेनेला उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत पवन पांडेंच्या रुपानं आमदार मिळाला होता. काही राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किरकोळ यश मिळालं होतं. आता प्रथमच कलाबेन डेलकरांच्या रुपानं शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर खासदार लाभला आहे.
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. त्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेनं तिथं पोटनिवडणूक लढवली. डेलकर कुटुंबाचा प्रभाव आणि मतदारांमधील सहानुभूती तसेच शिवसेनेचे नेते पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी केलेल्या प्रचाराच्या बळावर तिथं विजयाचं गणित जुळवल्याचं मानलं जातं.
दादरा नगर हवेलीत रंगतदार लढत
शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित आणि काँग्रेसचे महेश धोदी यांच्यात तिथे लढत झाली. या पोटनिवडणुकीत ७५.९१ टक्के मतदान झाले.
भाजपाने या निवडणुकीच्या प्रचारासाठी संपूर्ण बळ झोकून दिले होते. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला यांनी भाजपाचे उमेदवार महेश गावित यांच्यासाठी खूपच बळ लावले होते. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही प्रचारात सहभागी झाले होते.
शिवसेनेकडून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवेसेना नेते संजय राऊत यांनी प्रचारात भाग घेतला होता.