मुक्तपीठ टीम
चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यात आली आहे. सागरी सीमेचे रक्षण करण्यासाठी नौदलाला आणखी एक शक्तीशाली युद्धनौका मिळाली आहे. मुंबईतील माझगाव डॉक येथे बांधलेली विशाखापट्टणम ही युद्धनौका सर्व चाचण्यांनंतर नौदलाकडे सोपवण्यात आली आहे.
अत्याधुनिक प्राणघातक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या विशाखापट्टणमची चाचणी गेल्या एक वर्षापासून सुरू आहे. या युद्धनौकेने खोल समुद्रासह सर्व शस्त्रांची चाचणी यशस्वी पार पाडली आहे. ती लवकरच नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात येईल. विशाखापट्टणम हे भारतीय लष्कराच्या प्रकल्प १५बी अंतर्गत बांधण्यात आले आहे. २०१५ च्या सुमारास पहिल्यांदाच या नौकेला पाण्यात सोडण्यात आले होते.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राणघातक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या या युद्धनौकेत ३१२ जवानांची सोय करण्यात आली आहे. माझगाव डॉक येथे बांधण्यात आलेल्या विशाखापट्टणमचे डिझाईन नौदल डिझाइन महासंचालनालयाने तयार केले आहे. जहाज बांधणीसाठी वापरले जाणारे टणक पोलाद देशातच तयार केले जाते, तर त्यापूर्वी भारताला युद्धनौकेत वापरल्या जाणाऱ्या स्टीलसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत होते. १६४ मीटर लांबीच्या युद्धनौकेवर सर्व उपकरणे आणि शस्त्रे तैनात केल्यानंतर एकूण वजन ७,५०० टन झाले आहे.