मुक्तपीठ टीम
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या विविध प्रकल्पांच्या उभारणीत उद्योजकांचे तसेच स्थानिकांचे सहकार्य घ्या. प्राधान्यक्रम निश्चित करून कामे वेळेत पूर्ण करा. प्राणी उद्यान पर्यटक, वन्यजीव प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरावे असे प्रयत्न करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली.
बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश, मुख्य वन संरक्षक सुनील लिमये आदी उपस्थित होते. बैठकीत सुरुवातीला प्राणी उद्यानाचे व्यवस्थापकीय संचालक एन.वासुदेवन यांनी सादरीकरण केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, या प्रकल्पासाठी उद्योजकांना आणि स्थानिकांना सोबत घेऊन नियोजन करा. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उद्यानात विविध देशांतील प्राणी, पक्षी आणण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामस्थांना रोजगार, उद्योग संधी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. पर्यटकांना आकर्षित करता येईल अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यासाठी वन विकास प्राधिकरणाने समन्वय साधावा. उद्योजक, स्थानिक व्यावसायिक आदींना सोबत घ्यावे. समृद्धी महामार्ग पूर्ण होत आहे. यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अफ्रिकन सफारी, नाईट सफारी असे विविध उपक्रम राबविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. याठिकाणी आदिवासी ग्राम तयार करून आदिवासींनी उत्पादीत केलेल्या मालासाठी बाजारपेठ निर्माण करावी.आदिवासी परंपरा आणि संस्कृती पर्यटकांना माहिती होण्यासाठी आदिवासी चित्रकला, नृत्य आदीचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करावे, त्यांना रोजगार उपलब्ध होईल असे उपक्रम राबविण्यात यावेत असेही श्री ठाकरे यांनी सांगितले.
उद्यानात वन्य प्राणी आणि तृणभक्षी प्राण्यांच्या विविध प्रजाती त्यांच्या जवळच्या नैसर्गिक अधिवासात हे उद्यान आधीच नागपुरातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून बहरले आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आफ्रिकन सफारी, वॉक-इन एव्हियरी, ट्रायबल ट्रेल, वॉकिंग ट्रेल यासारखे आकर्षक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून हा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. नागपूर शहरास लागून असल्याने या प्रकल्पामुळे या भागात निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधी सुध्दा उपलब्ध होणार आहेत. वन्यजीव संवर्धन, संशोधन व शिक्षण तसेच वन्यजीवांचे पुनर्वसन याबाबतचे कामही या आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात केले जाणार आहे. प्राणी उद्यानात येणाऱ्या पर्यटकांकरिता पार्किंग, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, वाहने इत्यादी सुविधा करण्यात आल्याचेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.