मुक्तपीठ टीम
हेमंत टकले यांचे सोप्या व सुलभ पद्धतीचे लेखन व चिंतन बहुआयामी व प्रदीर्घ व्यासंगाची साक्ष देणारे असून ते अंतःकरणाचा ठाव घेणारे असते, असे उद्गगार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज काढले.
माजी आमदार हेमंत टकले यांनी २०१२ पासून राष्ट्रवादी मासिकामध्ये ‘शेवटचे पान’ या नावाने जे सदर लिहिले त्याचे पुस्तक सुज्ञान प्रकाशन, पुणे यांनी प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाचे अनावरण आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आम्ही ‘राष्ट्रवादी’ हे मासिक काढतो. इतर मासिकांपेक्षा व इतर राजकीय पक्षांपेक्षा आमचे मासिक थोडे वेगळ्या प्रकारचे आहे. देशातले काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्या संबंधातली आमची भूमिका याबाबत त्यात लिहिलेले असतेच. जनतेवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराची दखल घेऊन १५-२० पानात त्याची मांडणीही केलेली असते. ३५ ते ४० पाने मात्र नवीन माहिती व नवनवे विषय यासंबंधी असते. ही माहिती पक्षातील सहकाऱ्यांपर्यंत जावी आणि त्यातून बदलत्या जगाशी त्यांचा सुसंवाद व्हावा, हा त्यामागील उद्देश असतो. हे मासिक दिवसेंदिवस एका वर्गात खूप लोकप्रिय होते आहे आणि त्याची दखल समाजातील जाणकार वर्ग घेतो, याचे मला समाधान आहे असे शरद पवार म्हणाले.
उर्दू भाषेमध्ये जसे शेवटच्या पानापासून वाचायला सुरुवात करतात तसे राष्ट्रवादी मासिक हातात आल्यानंतर मी प्रथम हेमंत टकले यांचे ‘शेवटचे पान’ वाचतो आणि तिथून अंक वाचायला सुरुवात करतो, असे सांगून शरद पवार यांनी मध्यंतरी त्यांनी आंध्रमधील प्राध्यापक वरवराराव यांच्या संबंधी लिहिले होते. पुण्यामध्ये जी एल्गार परिषद झाली. त्यात वरवराराव यांचे भाषण झाले होते. मी परिषदेतील लोकांची झालेली सर्व भाषणे बारकाईने वाचली. तो विषय दुर्दैवाने केंद्रसरकारने हातात घेऊन अनेकांना तुरुंगात टाकले. वरवराराव यांना उतारवयात जेलमध्ये जावे लागले. केंद्रसरकारने त्यांचा खूप छळ केला. हेमंत टकले यांनी शेवटच्या पानातून वरवराराव यांची संपूर्ण पार्श्वभूमी व तुरुंगात होत असलेला छळ याची अत्यंत सोप्या व सुलभ पद्धतीने मांडणी केली. हा मजकूर वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. अत्यंत कमी व मोजक्या शब्दात विषयाची चिंतनगर्भ मांडणी हे हेमंत टकले यांच्या लेखनाचे वैशिष्ट आहे. त्यांनी असेच बहुआयामी व व्यासंगी लिखाण करीत राहावे असे शब्दरुपी आशिर्वाद शरद पवार यांनी दिला.
राष्ट्रवादी मासिकाचे संपादक व पुस्तकाचे प्रकाशक डॉ. सुधीर भोंगळे यांनी प्रास्ताविक केले. तन्मयतेज टकले यांनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांचे स्वागत केले. लेखकाचे मनोगत व्यक्त करताना हेमंत टकले यांनी अनुभवातून मी लिहित गेलो. सदरात राजकारणाचे विषय जरूर असतील पण इतर जीवनाशी संबंधित असंख्य विषय आहेत. ते मांडण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः या लेखनातून समृद्ध झालो. पवारसाहेबांनी घालून दिलेल्या वाटेवरती प्रवास करताना मला खूप शिकता आले. या सदराच्या लेखनाने मला प्रचंड समाधान मिळाले असे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी मासिकाच्या छपाईचे काम करणारे दिलीप कवळी यांनी पुस्तकासंबंधी तयार केलेली डॉक्युमेंटरी यावेळी दाखविण्यात आली.
यावेळी माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, राष्ट्रवादी मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे, मासिकाच्या छपाईचे काम करणारे दिलीप कवळी उपस्थित होते.