मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडेंविरोधात संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग माफियाशी संबंध असल्याचे ते म्हणाले. क्रुझ ड्रग्स पार्टीमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग माफियाही उपस्थित होता, असे मलिक यांनी सांगितले. आज त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला आहे, जर एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केले तर त्याला अनुसुचित जातींचे लाभ मिळावेत का?
आज थेट मोदींना प्रश्न!
नवाब मलिक म्हणाले की, मी कागदपत्राच्या आधारे बोलत आहे, हे कोणत्याही हिंदू मुस्लिम राजकारणावर बोलत नाही आणि मी अशा राजकारणावर विश्वास ठेवत नाही, शेड्यूल कास्टमधून दुसऱ्या धर्मात जाणाऱ्या व्यक्तीला कोणताही फायदा मिळत नाही. तर भाजपाने जावई ड्रग प्रकरणात आठ महिने गजाआड राहिल्याने ते एनएसीबीच्या समीर वानखेडेंना लक्ष्य करीत आहे, असे प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान आज समीर वानखेडे याचे मुस्लिम पध्दतीने जे लग्न झाले त्याचा फोटो आणि लग्नपत्रिका ट्वीटरवर शेअर करुन नवाब मलिक यांनी आणखी एका बोगस प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.
एनसीबीच्या अधिकार्याने एक पत्र माझ्याकडे पाठवले होते ते पत्र डीजी आणि एनसीबीकडे माझ्या लेटरहेडवरुन पाठवले आहे.सीबीसीच्या मार्गदर्शक सुचनेवरुन निनावी पत्राची चौकशी होत नाही परंतु ज्यापध्दतीने त्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होवू शकतो असेही नवाब मलिक म्हणाले.
समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी जी समिती आली आहे. त्यांनी पंचांना बोलावले आहे. एनसीबी इलेक्ट्रॉनिक पुराव्याआधारे कारवाई करते असे सांगितले जाते. प्रभाकर साहीलने संपूर्ण घटना प्रतिज्ञापत्र व व्हिडीओ करुन तो प्रसारित केला आहे. जी चौकशी समिती आली आहे त्यांनी समीर वानखेडे, के. पी. गोसावी, प्रभाकर साहील आणि वानखेडे यांचा ड्रायव्हर माने या सर्वांचा सीडीआर काढावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
ज्या गाडीचा वापर ५० लाख रुपये नेण्यासाठी करण्यात आला ती गाडी आणि ज्यापध्दतीने सॅम डिसुझा यांच्याकडे पैसे देण्यात आले हे बघता त्यांचा जबाब घेण्याची आवश्यकता नाही कारण एनसीबी इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे चौकशी करते त्यामुळे सीडीआर काढल्यास सर्व सत्य समोर येईल. एवढी मोठी देशाची एजन्सी आहे. आमच्यापेक्षा चार पावले अधिक काम करत असेल तर मी ज्यांच्याकडे इशारा करत आहे त्याविषयाकडे लक्ष देतील असेही नवाब मलिक म्हणाले.
एनसीबीने एक वर्षांपूर्वी एक एफआयआर दाखल केला होता. त्यामध्ये एकालाही अटक झालेली नाही. परंतु त्या एफआयआर वरुन दिपिका पदुकोण, साराअली खान यांना बोलावण्यात आले मात्र अटक करण्यात आली नाही. हे सर्व खोटं असेल तर त्यावेळी मिडियाने दाखवलेले फुटेज बघावे आणि त्या खोलात जाऊन चौकशी करा. मालदीव दौर्याकडे लक्ष द्या. त्यावेळी मालदीवमध्ये कोण कोण अभिनेता आणि अभिनेत्री होते हा सगळा खेळ समोर येईल असेही नवाब मलिक यांनी चौकशी समितीला माध्यमातून सांगितले आहे.
क्रुझवरील चौकशी भरकटवण्यासाठी नवाब मलिक गेले २० दिवस वेगवेगळ्या गोष्टी समोर आणत आहेत असा आरोपही केला जात आहे मात्र मी माझं काम करत आहे. ज्या गोष्टी खोट्या आहेत त्या समोर आणत आहे. ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे ती पट्टी काढण्याचं काम व कर्तव्य आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
क्रुझवरील पार्टी ही फॅशन टिव्हीने आयोजित केली होती. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय आणि कोविड नियमांचे पालन न करता थेट सिपिंग डायरेक्टरची परवानगी घेऊन करण्यात आली होती. त्या जहाजावर टार्गेट करून काही लोकांचे फोटो घेऊन ट्रॅक करण्यात आले. त्या पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड होती ती हातात खतरनाक रिव्हॉल्व्हर घेऊन उपस्थित होती. तिथल्या रेव्ह पार्टीत नाचताना एक दाढीवाला आहे तो दाढीवाला कोण आहे हे एनसीबीच्या अधिकार्यांना माहीत आहे असा गौप्यस्फोटही नवाब मलिक यांनी आज केला.
जे चौकशी अधिकारी आले आहेत त्यांनी क्रुझवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर त्यांना त्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया उपस्थित होता हे दिसेल. खेळ तर झाला परंतु खेळाचा खेळाडू गाडी घेऊन का फिरत आहे याचं उत्तर एनसीबीने द्यावे. हे आज बोलत आहे त्याचे पुरावे येत्या काही दिवसात आपल्यासमोर ठेवणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
एका जाहीर सभेत बोलताना समीर वानखेडेची नोकरी जाईल आणि तो तुरुंगात असेल असे वक्तव्य केले होते. त्यावेळी मी कोणताही पोलीस यंत्रणेचा वापर केला नव्हता. समीर दाऊद वानखेडे याच्या धर्माबाबत प्रश्न उपस्थित केला नाही. माझा सवाल एकच आहे समीर दाऊद वानखेडे याने फर्जी दस्ताऐवजाच्या आधारावर अनुसूचित जातीचा दाखला बनवून IRS ची नोकरी मिळवली आणि एका गरीब दलित मुलाचा अधिकार हिरावून घेतला आहे. मी कुठल्याही धर्माची चर्चा केली नाही. समीर वानखेडेचा जो फर्जीवाडा आहे. फर्जी पध्दतीने दाखला घेतला त्या आधारावर नोकरी घेतली हा मुद्दा लावून धरल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
समीर वानखेडे यांचा जन्मदाखला अगोदर शेअर केला त्यावर हे फर्जी आहे हे फर्जी आहे असे बोलत होते. फर्जी आहे तर खरा दाखला कुठे आहे हे कुटुंबातील लोकांनी सांगितले पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले.
आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी ट्वीटरवर एका सुंदर जोडीचा फोटो टाकला आहे. जो ७ डिसेंबर २००६ रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये लग्न (निकाह) केले. तो लग्नदाखलाही ट्वीटरवर शेअर केला आहे. त्या दाखल्यात दोन रकाने रिकामे करण्यात आले आहेत. त्यामध्ये मुलीच्या वडिलांचे नाव आहे. त्यांच्या चुलत्याचे नाव आहे. तो रकाना यासाठी रिकामा ठेवण्यात आला आहे की, त्यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीने घडत आहे. म्हणून ते दोन रकाने रिकामे आहेत. जन्मदाखल्यावर जे बोट दाखवत होते त्यांना सांगू इच्छितो की तो दाखला महानगरपालिकेच्या दस्तऐवजातील एक हिस्सा आहे.जे कागद मी शेअर करत आहे ते खरे व सरकारी दस्ताऐवज आहेत हे जबाबदारीने सांगत आहे. त्याकडे गांभीर्याने पाहिले तर २० वर्षानंतर टेंपर करुन त्यावर स्टार बनवून वेगळया पध्दतीने नावाचा खेळ करण्यात आला आहे असेही मंत्री नवाब मलिक म्हणाले.
आज नवाब मलिक यांनी निकाहनामा जाहीर केला आहे. त्यात मस्जिद व मदरसा याचा पत्ता आहे. कालपर्यंत आम्ही हिंदू राहिलो आहे असे बोलत होते. मुसलमानचा प्रश्न उठवत नाही. या देशाचा कायदा सांगतो की, कुठलाही व्यक्ती धर्मांतर करत असेल तर त्याला दलित जातीचा लाभ मिळत नाही. विशेष करुन मुस्लिम व ख्रिश्चन धर्मातील सवाल आहे. कुणाला वाटत असेल की, हे चुकीचे आहे तर मोदी आहेत. देशाचं संविधान बदलावं की एखादा दलित मुस्लिम, ख्रिश्चन धर्मात जात असेलतर लाभ मिळेल किंवा तीच पध्दत असेल तर उद्या मी सुद्धा दावा करु शकतो की माझे पूर्वज किंवा माझ्या सोबतच देशात राहणारे कोट्यवधी लोक असतील तर संघ परिवार दावा करत होते. मोहन भागवत बोलत होते सर्वांचे पूर्वज एक आहेत. हा आमचे पूर्वज या देशात शूद्र होते. समजा आम्ही पुन्हा अनुसूचित जातीतील आहोत तर या देशातील १५ कोटी मुसलमानांना हा लाभ मिळेल का? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
मी सरकारी दस्तऐवजावर बोलत आहे. कोण धर्म बदलत असेल तर मला कोणतीच आपत्ती नाही परंतु देशाचा कायदा सांगतो की, अनुसूचित जातीचा असेल आणि धर्मांतर केले तर त्याला अनुसूचित जातीचा फायदा मिळत नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
भाजपाचे मलिकांना प्रत्युत्तर
नवाब मलिक यांच्या आरोपांना भाजप आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, नवाब मलिक एनसीबी आणि समीर वानखेडे यांना टार्गेट करत आहेत कारण एनसीबीने मलिकच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यांचा जावई समीर खान या वर्षी सप्टेंबरमध्ये नऊ महिन्यांनंतर जामिनावर सुटला आहे.