मुक्तपीठ टीम
आर्यन खानच्या जामीनावरील सुनावणी बुधवारी पुढे ढकलण्यात आली आहे. त्याला जामीन मिळावा यासाठी देशाचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी उच्च न्यायालयात आर्यनची बाजू मांडली आहे. सतीश मानशिंदे आणि अमित देसाई यांच्यानंतर आर्यन खटल्यातील मुकुल रोहतगी हे तिसरे वकील आहेत. याआधी २० ऑक्टोबरला आर्यन खानचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. अखेर न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याच्या जामीनावरील पुढील सुनावणी बुधवारी दुपारी अडीच वाजता ठेवण्यात आली आहे.
आर्यन प्रकरणातील आताचे महत्वाचे मुद्दे
- आतापर्यंत आर्यन खान आणि त्याच्या फोन चॅट्सवरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे एनसीबीने त्याच्यावर आरोप केले होते.
- मात्र सध्या तपास यंत्रणाच , त्यातही तपास अधिकारी समीर वानखेडे हेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
- आर्यनविरोधातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईलनेच एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडेंसह इतरांवर वसुलीचा आरोप करणारे प्रतिज्ञापत्र केले आहे.
- प्रभाकर सेलच्या प्रतिज्ञापत्रातच साक्षीदाराकडून साध्या पानांवर सह्या घेण्याचाही उल्लेख आहे.
- एनसीबी कार्यालयात एनसीबीच्या ताब्यात असलेल्या आर्यन खानसोबत बसलेल्या, सेल्फी घेणारा, त्याचे फोनवर बोलणं करून देणाऱ्या केपी गोसावीचे प्रकरणही वादाचे ठरू शकते.
- एनसीबीचा इन्फॉर्मर असणारा केपी गोसावी चार गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. तसेच पुण्यातील फसवणूक प्रकरणात तो स्वत: फरार आहे.
- यामुळे एनसीबीचा तपास, त्यांनी नोंदवलेला गुन्हा सर्वच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
आर्यनचा निर्दोष असल्याचा दावा, देशा सोडणार नसल्याची खात्री!
- आर्यन खानने जामीन अर्जासोबत हायकोर्टात प्रतिज्ञापत्रही दिले आहे.
- यामध्ये आर्यनने म्हटले आहे की, “मी निर्दोष आहे. मला फसवले जात आहे.
- प्रतिज्ञापत्रात आर्यनने असेही म्हटले आहे की, जामीन मिळाल्यावर तो देश सोडणार नाही.
- खटल्याच्या तपासावर किंवा पुरावे किंवा साक्षीदारांवर त्याचा परिणाम होणार नाही.
आर्यन खानच्या जामिनासाठीचे युक्तिवाद
- एनसीबीचे आरोप चुकीचे असल्याचे सांगत आर्यन खानच्या वकिलांनी सत्र न्यायालयात अनेक युक्तिवाद केले आहेत.
- ज्यामध्ये आर्यन खानकडून ड्रग्स जप्त करण्यात आले नसून, त्याच्यावर खोटा आरोप करण्यात आला होता असे म्हटले आहे.
- आर्यन खानकडून एकही मादक पदार्थ जप्त करण्यात आलेला नाही.
- मादक पदार्थ मिळाले ते त्याच्या मित्राच्या शुजमध्ये, त्याच्यासी आर्यनचा काहीही संबंध नाही.
- आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर एनसीबीने आवश्यक चाचणीही केलेली नाही.
- आर्यन पार्टीत विशेष निमंत्रित म्हणून बोलवण्यात आल्याने गेला होता. स्वत:हून गेला होता.
- आरोप खोटा असल्याने एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ३७ (१) लागू होत नाही.
- कलम ३७ गंभीर गुन्ह्यांशी संबंधित आहे जे दखलपात्र आणि अजामीनपात्र आहेत.
- एनसीबीने कोणतेही सबळ पुरावे नसताना गुन्हे दाखल करुन त्यांना डांबले आहे.
- आर्यनने अर्थपुरवठा केल्याचेही कुठेही सिद्ध झालेले नाही.
- एनसीबीने फक्त काही व्हॉट्सअॅप चॅट पुरावे म्हणून सादर केले आहेत, मात्र, तेही २०१८, २०१९चे आहेत, आताचे नाहीत.
जामिनासाठी आर्यनच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा हवाला!
- आर्यन खान हा तरुण असून त्याचा कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी इतिहास नाही.
- आर्यन खान हा समाजातील प्रतिष्ठित घटक आहे. तो आपल्या कुटुंबासह मुंबईचा रहिवाशी आहे, तो फरार होण्याची किंवा न्यायापासून पळून जाण्याची शक्यता नाही.
- आर्यनला जबाबदार नागरिक आहे. तो बॉलीवूडमधील एका मोठ्या चित्रपट अभिनेत्याचा मुलगा आहे, ज्याने यूएसएच्या युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधून चित्रपटविषयक पदवी घेतली आहे.
- तो भारताचा एक जबाबदार नागरिक आहे आणि आजपर्यंत त्याची प्रतिष्ठा आणि सभ्यतेचा रेकॉर्ड आहे, असेही सांगण्यात आले.
एनसीबीची स्वत:च्याच स्वतंत्र साक्षीदाराविरोधात न्यायालयात धाव
- आर्यन खान प्रकरणात सर्वात धक्कादायक ठरले ते एनसीबीच्याच एका स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईलने लावलेले वसुलीचे आरोप.
- एनसीबीचा साक्षीदार प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल करून आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी वसूलीचा प्रयत्न सुरु असल्याचे संभाषण ऐकले असल्याचे सांगितले.
- यातील ८ कोटी समीर वानखेडेकडे जाणार होते, असे ऐकल्याचेही त्याने सांगितले आहे.
- त्यानंतर एनसीबीने या आरोपांच्या चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन केली आहे.
- साक्षीदार प्रभाकर साईल याच्या जबाबावरून एनसीबीने सोमवारी सकाळी सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
- एनसीबीने या वक्तव्यावर कारवाईची मागणी केली होती.
- त्यावर एनसीबीच्या अर्जावर सत्र न्यायालयाने हे प्रकरण आमच्या अधिकारात नसल्याचे सांगितले.
- सत्र न्यायालयाने सांगितले की, जामिनाचे प्रकरण उच्च न्यायालयात सुरू आहे. यावर कोणताही आदेश देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
आर्यन खानच्या जामिनाला विरोधासाठीचे मुद्दे
- आर्यन खानला जामीन मिळू नये यासाठी एनसीबीने सातत्याने तो प्रभावशाली कुटुंबातील असल्याचा दावा केला आहे.
- त्यामुळे तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, असे म्हटले होते.
- तसेच त्यासाठी एनसीबीचा स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईलने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा हवाला देण्यात आला आहे.
- ते प्रतिज्ञापत्र आर्यनला फायदा पोहचवण्यासाठी करून घेतल्याचाही आरोप झाला.
- यासोबतच आर्यन नियमितपणे ड्रग्ज घेत असल्याचे सांगण्यात आले.
- आरोपींचे परदेशी नागरिक आणि इतर ड्रग्ज विक्रेत्यांशी संबंध आहेत. ज्यांचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कशी संबंध आहे, ज्याचा तपास अद्याप सुरू आहे.
- कोणत्याही आरोपीची सुटका झाल्यास संपूर्ण तपासाला फटका बसू शकतो.
- चौकशीदरम्यान आरोपीने त्या लोकांची नावे उघड केली नाहीत आणि केवळ आरोपीच त्या लोकांची माहिती देऊ शकतो असे सांगितले आहे.