मुक्तपीठ टीम
दिवाळी म्हणजे भारतीयांसाठी सर्वात मोठा सण. उल्हास, जल्लोष आणि दीपोत्सव हे समीकरण ठरलेलेच. या आपल्या आवडत्या उत्सवाची सगळीकडेच जोरात तयारी सुरू झाली आहे. सर्व मोठ-मोठे ब्रँड त्यांच्या उत्पादनांसाठी जाहिरात करत आहेत. कॅडबरी खास प्रसंगी आणि सणांसाठी खास जाहिराती घेऊन येते. या दिवाळीपूर्वीही अभिनेता शाहरुख खानसह कॅडबरीने एक खास जाहिरात केली आहे. सध्या संकटात असलेल्या शाहरुखने आपल्या देशातील संकटात असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना साथ देणारी जाहिरात केली आहे. त्यामुळे कॅडबरी आणि शाहरुखच्या या जाहिरातीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कॅडबरी कंपनीने शाहरुखला छोट्या आणि स्थानिक व्यापार्यांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घेतले आहे. अभिनेता जाहिरातीत स्थानिक दुकानदारांचे प्रमोशन करीत आहे. या दुकानदारांना कोरोना विषाणूच्या साथीमुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे. ‘नॉट जस्ट अ कॅडबरी अॅड’ शीर्षक असलेल्या या जाहिरातीची सुरुवात स्थानिक व्यावसायिकांच्या व्हॉईस-ओव्हर्स आणि बाइट्सने झाली. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, कोरोनामुळे किती वाईट परिणाम झाला आहे.
व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, या दिवाळीत आम्ही भारतातील सर्वात मोठ्या ब्रँड अॅम्बेसेडरला आमचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवून अनेक छोट्या व्यवसायांना मदत केली. पुढच्या शॉटमध्ये शाहरुख खान शेरवानी परिधान करताना दिसला. वेगवेगळ्या दुकानांची नावे घेतली. त्यांनी लोकांना त्यांचे कपडे, शूज, मिठाई, गॅझेट इत्यादी खरेदी करण्याचे आवाहन केले. कॅडबरी कंपनीचे म्हणणे आहे की, “जाहिरातीमध्ये शाहरुखचा चेहरा आणि आवाज पुन्हा तयार करण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर केला गेला आहे.”
व्हिडिओच्या शेवटी शाहरुख खान म्हणतो की, “आपल्या आजूबाजूला दुकाने आहेत. त्यांच्यासाठीही दिवाळी गोड असावी.” ही जाहिरात यूट्यूबवर अपलोड झाल्यानंतर व्हायरल झाली. नेटकऱ्यांकडून कॅडबरी आणि शाहरुखच्या या व्हिडीओचे खूप कौतुक करत आहेत.
Great initiative 👏