मुक्तपीठ टीम
भाजपामध्ये गेलेले नेते आता लवकरच राष्ट्रवादीत परततील असा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी केला आहे.’जन संवाद’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाटील ठाणे दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलत होते.
एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “यापूर्वी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यापैकी अनेकांना घरी परतण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी तयारी करत आहेत. येत्या काही महिन्यांत तुम्हाला त्यापैकी बरेच राष्ट्रवादीत पुन्हा दिसतील.
जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी भाजपाचे केंद्रसरकार आपल्या एजन्सींचा दुरुपयोग करतेय, लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करतेय हे आज टिव्हीवर ऐकल्यावर व पाहिल्यावर लक्षात येते आहे, अशी टीका कली.आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली होती त्यांना पकडून नेण्यात भाजपाचे लोक पुढे होते. त्यानंतर अशी पैशाची मागणी होत असेल तर बरेच लोक यामध्ये सहभागी असण्याची शक्यताही जयंत पाटील यांनी बोलून दाखवली आहे.
जलसंपदा मंत्री म्हणाले की, राज्याच्या शहरी भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. “राज्य सरकार उपलब्ध स्त्रोतांचा आढावा घेत आहे आणि वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या जातील. दमणगंगा आणि पिंजाळ नद्यांचे पाणी शहरे आणि गावांमध्ये आणण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत,” असे ते म्हणाले.