मुक्तपीठ टीम
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या शेतकरी हत्याकांडाच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीचे प्रमुख उपेंद्र कुमार अग्रवाल यांची बदली करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशात २०२२च्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच योगी सरकारने सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू केल्या आहेत. त्यातच केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशिष मिश्राची चौकशी करून अटकेचा निर्णय घेणाऱ्या अग्रवाल यांची बदली खळबळ माजवणारी ठरली आहे. गुरुवारी रात्री उशीरा झालेल्या सहा आयपीएसच्या बदल्यांमध्ये अग्रवाल यांचाही समावेश आहे.
अग्रवालांच्या भूमिकेमुळे शक्य झाली मंत्रीपुत्राची अटक
- उपेंद्र कुमार अग्रवाल सध्या लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सहा सदस्यीय एसआयटीचे प्रमुख आहेत.
- लखीमपूरमध्ये चार शेतकऱ्यांना थार जिपखाली चिरडणारा मारेकरी आशिष मिश्राच असल्याचा आरोप झाला. तसा गुन्हाही नोंदवण्यात आला.
- मात्र, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेणी हे अडून बसले होते.
- आपला मुलगा आशिष मिश्र घटनास्थळी नव्हताच, असा दावा ते करत होते.
- मात्र, साक्षीदारांनी दिलेली माहिती, कॅमेरा फुटेज आणि आशिषच्या जबाबातील विसंगतींचा अभ्यास करुन अग्रवाल यांनी काही गोष्टी टिपल्या.
- त्यानुसार जीपखाली शेतकऱ्यांना चिरडण्यातील आरोपी आशिषच असल्याचे नोंदवत अग्रवालांनी त्याला अटक केली.
- आता डीजीपी मुख्यालयात तैनात त्याच पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून उपेंद्र कुमार अग्रवाल यांना गोंडाचे नवीन डीआयजी बनवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशात कोणाची कुठे बदली?
- डीजीपी कार्यालयात कायदा आणि सुव्यवस्थेचे पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त झालेले मोडक रोजाश डी राव यांना बस्ती परिक्षेत्राचे आयजी बनवण्यात आले आहे.
- बस्तीमध्ये आयजी म्हणून तैनात अनिल कुमार राय यांना लखनौचे पीएसी क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बनवण्यात आले आहे.
- आयजी अयोध्या म्हणून तैनात संजीव गुप्ता यांना पोलीस महानिरीक्षक, कायदा आणि सुव्यवस्था म्हणून लखनौला पाठवण्यात आले आहे.
- प्रयागराजचे आयजी केपी सिंह अयोध्येचे नवीन आयजी बनले आहेत. -गोंडाचे आयजी राकेश सिंह यांना प्रयागराजचे नवीन आयजी बनवण्यात आले आहे.
- डीजीपी मुख्यालयात तैनात पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून उपेंद्र कुमार अग्रवाल यांना गोंडाचे नवीन डीआयजी बनवण्यात आले आहे.