मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देशातील शंभर कोटी लसीकऱणाबद्दल शंका व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्र सरकारला विचारलं आहे की, जगामध्ये आपला देश लसीकरणात १९ व्या स्थानावर आहे. यामुळे १०० कोटी डोस खरोखरच पूर्ण झाले आहेत का? तेवढ्यावरच न थांबता राऊत यांनी सातत्यानं आघाडीवर आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्यांनाही लक्ष्य केले आहे. प्रकरण पाठवलेली क्रिस्टल कंपनी नक्की कोणाची ते तुम्ही जाहीर करा, अस आव्हान त्यांनी सोमय्यांना दिले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्यांना आव्हान
- जे लोकं सतत भ्रष्टाचारावर बोलतात, देशातील, राज्यातील भ्रष्टाचार संपावा असं ज्यांना वाटतं त्यांच्याकडे आम्ही हे प्रकरण पाठवलं आहे. त्यांनी अभ्यास करावा.
- ही क्रिस्टल कंपनी कोणाची आहे ते आधी त्यांनी जाहीर करावं. मग त्या कंपनीचे इतर घोटाळे आम्ही जाहीर करू.
- भ्रष्टाचार हा कोणत्याही राजकीय पक्षाचा, धर्माचा आणि जातीचा नसतो. भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो.
- जे भ्रष्टाचाराविरोधात लढत असतात. त्याचं नेतृत्व करतात त्यांनीही राजकीय पक्षाकडे पाहायचं नसतं.
- जरी माझ्या घरात भ्रष्टाचार असेल तर त्यावरही मी बोलले पाहिजे. म्हणून मी योग्य ठिकाणी पाठवलं आहे.
- कंप्लेट कुठे करायची, कशा पद्धतीने करायची हे आम्हाला माहीत आहे. कोणते कागद लावायचे हे आम्हाला माहीत आहे, ते आम्ही करणारच आहोत. पण तरीही तुमची काय एक्सपर्ट कमेंट आहे ती आम्हाला समजून घ्यायची आहे.
जगात लसीकरणात १९ वे, मग १०० कोटी डोस नक्की झाले?
भारतातील लसीकरणाने शंभर कोटी डोसचा मोठा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार होतानाच यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि चर्चेला उधाण आलेलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारला सवाल करत विचारलं आहे की, जगामध्ये आपला देश लसीकरणात १९ व्या स्थानावर आहे. यामुळे १०० कोटी डोस खरोखरच पूर्ण झाले आहेत का? झाले असतील तर आनंदच आहे. लसीकरणा संदर्भात नेहमीच वेगवेगळे आकडे येत असतात, असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारला टोमणा मारला आहे.
देशात सध्या इव्हेंट सुरु!
१०० कोटी लसींचा टप्पा पार हा सामूहिक शक्ती आणि सर्वांची साथ, सर्वांच्या विश्वासामुळेच हे शक्य झालं आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. परंतु राऊत यांनी टोला देत म्हटलं की, “काही लोकं म्हणतात ३३ कोटींचे दोन डोस झाले आहे. काही लोक म्हणत आहेत आम्हाला दुसरा डोस मिळत नाहीये. पण शेवटी एखाद्या गोष्टीचं सेलिब्रेशन करायचं म्हटलं, उत्सव करायचा म्हटलं तर या देशात नवीन प्रथा पायंडा पडला आहे. मोदींच्या उत्सवात सर्वांनी सामिल होऊ या. देशात सध्या इव्हेंट सुरू आहे.”
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार, हे आव्हानच!
देशात प्रखर राष्ट्रवादी सरकार असतानाही बांगलादेशी घाबरत नसेल, अतिरेकी हल्ले करत असतील तर ते राष्ट्रवादी सरकारला मोठं आव्हान आहे. कारण, बांगलादेश आणि काश्मीर या दोन्ही ठिकाणी हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. यावरूनही संजय राऊत यांनी टीका केली.