मुक्तपीठ टीम
केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे लोक खूप त्रास सहन करत आहेत. तर या संकटातही काही लोक सर्व अडथळे पार करून आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत. केरळमधील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. ज्यात वधू आणि वर एका मोठ्या स्वयंपाकाच्या भांड्यात बसून मजेने मंदिरात जात आहेत. मुसळधार पावसामुळे या परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते.
केरळमधील अशा कठीण परिस्थितीत या जोडप्याला लग्नासाठी मंदिरात पोहोचणे कठीण होते. यामुळे, जोडप्याने मोठ्या अॅल्युमिनियमच्या स्वयंपाकाच्या भांड्यात बसून मंदिरापर्यंतचा प्रवास केला. हे दोघेही आरोग्य कर्मचारी आहेत. लग्न स्थळी पोहोचण्याची पद्धत विचित्र वाटत असली तरी, परिस्थितीमुळे लग्न पुढे ढकलण्याऐवजी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांचं कौतुकच होतंय.
राज्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाला असून अलाप्पुझाचा कुट्टनाड येथील परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. या भागातील रस्ते गुडघाभर पाण्याखाली होते. वधू ऐश्वर्या आणि वर राहुल, जे एकाच परिसरात राहतात, ते थाकाझी येथील स्थानिक मंदिरात लग्न करणार होते. पण हवामान बिघडले आणि सर्व रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले. अशा परिस्थितीत ना गाडी चालवता येत होती, ना इतर कोणतेही साधन. दोघांनाही त्यांचे लग्न पुढे ढकलण्याची इच्छा नव्हती आणि म्हणून मोठ्या स्वयंपाकाच्या भांड्यात बसून मंदिर गाठण्याचे त्यांनी मान्य केले. बाकीचे पाहुणे आणि नातेवाईकही पाण्यात चालत मंदिरात पोहोचले. पाऊस आणि पाणी साठल्याने लग्नाचा रंग विस्कळीत झाला. परंतु त्यांच्या आनंदाला कोणीही अडथळा आणू शकले नाही.
पाहा व्हिडीओ: