मुक्तपीठ टीम
प्रजासत्ताक भारताला आत्मनिर्भर भारत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार प्रयत्नशील आहे. दुबईत जे भारतीय स्थिरावलेत ते आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी दुबईत आलेत. मात्र भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांनीही भारत आत्मीनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. मोदी सरकार ने सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारतासाठीच्या विविध योजना प्रजासत्ताक भारताला आत्मनिर्भर भारत करण्यात यशस्वी होतील असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
दुबई मध्ये भारतीय उच्चायुक्तालयात भारताचा ७२ वा प्रजासत्ताक रामदास आठवले आणि उच्चायुक्त डॉ अमन पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
ना.रामदास आठवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन दुबईत साजरा झाला.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. भारतीय संविधानाची देशात २६ जानेवारी १९५० रोजी अंमलाबाजवणी सुरू झाली म्हणजे देश प्रजासत्ताक झाला.त्यामुळे २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन रिपब्लिक डे आहे.संविधानामुळे भारत संसदीय लोकशाहीचे जगात सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र ठरले असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जगात भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ असल्याचा आम्हा सर्व भारतीयांना अभिमान असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.