मुक्तपीठ टीम
कर्जत येथील बिरदोले, अवसरे व इतर भागातून रिलायन्सची गॅस पाईपलाईन गेली असून त्यामध्ये काही प्रकल्पबाधित शेतकरी यांची फसवणूक झाली आहे व त्यातील ४०-५० शेतकऱ्यांना आवश्यक पैसे द्यावेत अशा पद्धतीचे निर्देश शासनाने रिलायन्स कंपनीला विविध उपोषण व आंदोलन केल्यावर दिले होते. यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने व विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रशासन व कंपनीशी बोलणं केलं होतं . परंतु लेखी आदेश देऊनही कंपनी ऐकत नव्हती यामुळे संतप्त व उद्विग्न शेतकरी वर्गाने २६ जानेवारी रोजी प्रशासन व कंपनीला गॅस पाईपलाईन उखडण्याचा इशारा दिला. २६ जानेवारी रोजी सकाळ पासून शेतकरी शेताजवळ आंदोलनाला बसले होते व त्याठिकाणी भिवंडी ते नागोठणे पर्यंतचे काही शेतकरी देखील सहभागी झाले. दुपारी ३ च्या दरम्यान आमदार ठाकूर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आंदोलन ठिकाणी आले व त्याठिकाणी आमदारांनी रिलायन्स कंपनीवर जाहीर सभेत टीका करून आंदोलन स्थळी जाण्यास निघाले असता पोलीस व तहसीलदार यांनी त्यांना आंदोलनाच्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयात नेले. परंतु अधिकारी जमावाला पाहून तिथे आले नाहीत.
रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाशी आमदार ठाकूर यांचा पोलीस व प्रशासन यांच्या मार्फत संपर्क सुरू होता परंतु लेखी आश्वासन आले नाही म्हणून सुमारे ६ वाजेपर्यंत आमदार ठाकूर शेतकरी वर्गासह आंदोलनस्थळी आक्रमक भूमिका घेऊन बसले. यावेळी विधवा शेतकरी महिलांनी आपली दलालानी अंगठे घेऊन फसवणूक कशी केली याबाबत गाऱ्हाणे मांडले. सुमारे ६:३० च्या सुमारास रिलायन्सच्या वतीने मागण्याच्या अनुषंगाने लेखी पत्र देण्यात आले परंतु तरीही त्यावर विश्वास न बसल्याने शेतकऱ्यांना पैसे द्याच या भूमिकेवर ठाकूर कायम राहिले.
आक्रमक झालेल्या शेतकरी यांनी ठाकूर यांच्यासह गॅस पाईपलाईनच्या दिशेने जाण्यास सुरवात केली. पोलिसांनी बळाचा वापर करून ठाकूर यांना बाजूला केले व मोठ्या व्हॅन कडे कार्यकर्त्यांसह ओढत नेले असता जोपर्यंत आपण समन्वय साधून आम्हाला आश्वासन देत नाही तोपर्यंत आमदार ठाकूर शेतकरी वर्गासह रस्त्याच्या बाजूला बसले. पोलिसांनी लागलीच वाहतूक दुसरीकडे वळवली. यावेळी असंख्य शेतकरी व भाजप कार्यकर्ते यांनी धरणे धरले. तरी सुमारे एक तास प्रशासन व रिलायन्स कंपनीचा समन्वय झाला नाही. अखेर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या न्याय देण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकरी वर्गानी आपली भाषण केली व आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी शेतकरी गीत व पोवाडे म्हणत ठिय्या मांडला. यामुळे नेरळ परिसरात वेगळे वातावरण तयार झाले होते.
याबाबत जिल्हाधिकारी यानी सक्षम प्राधिकारी यांच्या मार्फत आपण आवश्यक सुनावण्या घेणार असून शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबत सुनावणी द्वारे ३ महिन्याच्या आत निकाल दिले जाईल असे आश्वासन ठाकूर यांना दिले. वेळ पडली तर आवश्यक ते कायदेशीर मार्ग अवलंबु पण शेतकऱ्यांना आवश्यक न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही असे ठाकूर यांनी जाहीर केले.
या प्रसंगी शेकडो शेतकरी बांधव यांच्यासह भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, सरचिटणीस राजेश भगत, जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, युवा मोर्चा प्रदेश सचिव हृषीकेश जोशी, किसान मोर्चाचे संपर्क प्रमुख सुनील गोगटे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, नरेश मसने, किरण ठाकरे, परशुराम म्हसे, शिरीष कदम, आंदोलनाचे प्रमुख केशव तरे, उमेश राणे, रमेश कालेकर, सुरेश खाडे यांच्यासह आगरी समाज संघटनेचे पदाधिकारी केशव मुने अरुण कराले उपस्थित होते.