मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र गुप्तचर विभागातून डेटा लीक झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना समन्स जारी केले आहे. १४ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.जयस्वाल यांना ई-मेलच्या माध्यमातून हा समन्स पाठवण्यात आला असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या संदर्भात माहिती देताना, मुंबई पोलिसांनी सांगितले की, राज्य गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला यांनी ट्रान्सफर-पोस्टिंग प्रकरणात गुप्तचर अहवाल तयार केला होता. या संदर्भात सायबर सेल विभाग, वांद्रे कुर्ला येथे अधिकृत गुप्त कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान तत्कालीन गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांना लक्ष्य केले होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या पत्राचा संदर्भ देत, महाराष्ट्रात ट्रान्सफर-पोस्टिंग रॅकेट आणि बडे नेते आणि अधिकाऱ्यांचे षडयंत्र असल्याचा आरोप आहे.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला, ज्यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला होता, त्या सध्या सीआरपीएफमध्ये सहाय्यक महासंचालक आहेत. यापूर्वी त्या महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागात आयुक्त होत्या. परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला दोघेही १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेल्या वर्षी लिहिलेल्या पत्रात रश्मी शुक्ला यांनी काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदली-पोस्टिंग रॅकेटमध्ये सामील असल्याचा दावा केला होता. पत्रासोबत रश्मी शुक्ला यांनी पुरावा म्हणून फोन रेकॉर्डिंग असल्याचा दावाही केला.
रश्मी शुक्ला यांनी हे पत्र गेल्या वर्षी २५ ऑगस्ट रोजी लिहिले होते. ज्यामध्ये असे म्हटले होते की, महाराष्ट्रातील पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांचे पोस्टिंग आणि बदलीचे रॅकेट उघड झाले आहे. त्याचे तार राज्यातील काही नेत्यांशी संबंधित आहेत. त्यांनी पत्रात लिहिले आहे की या प्रकरणाशी संबंधित लोकांचे फोन कॉल ट्रेस केले गेले. यामध्ये रॅकेटची बाब खरी असल्याचे सिद्ध झाले. काही दलाल आणि बड्या लोकांशी संबंधित होते.