मुक्तपीठ टीम
सरकारने शाळा उघडण्यास परवानगी दिल्यानंतर स्कूल बससाठी नवीन एसओपी जारी केली आहे. कोरोनाची लाट ओसरत असली तरीही मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र परिवहन विभागाने हा एसओपी जारी केला आहे. ज्यात विद्यार्थी संख्या, बसच्या आत तापमान २४-३०अंश ठेवणे, दररोज बस सॅनिटाइझ करणे, बसमध्ये तापमान तपासणी यंत्र ठेवणे आणि मुलं बसमध्ये कचरा करणार नाहीत याची काळजी घेणे अशा अटींचा समावेश आहे.
स्कूल बससाठी सरकारने ठरवलेली नियमावली
- स्कूल बसमधून क्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांनाच नेता येईल.
- बसमध्ये काही मास्क स्टॉकमध्ये ठेवावे लागतील.
- एखादा मुलगा विसरला तर त्याला मास्क दिला जावा.
- मुलांना अनधिकृत शालेय वाहनांमधून प्रवास करता येणार नाही.
- मुलांचे तापमान दर फेरीला तपासावे लागेल.
- बस रोज सॅनिटाइझ कराव्या लागतील.
- सर्व नियमांचे पालन करण्यासाठी पालक शिक्षक संघटना, शाळा प्रशासन आणि बस ऑपरेटर यांना स्वाक्षरी करावी लागेल.
बस ऑपरेटर संघटनेचा एसओपीला विरोध
अनिल गर्ग यांच्या मते, सरकारने नवीन एसओपी जारी केला आहे, त्यात अटींची भर पडल्यानंतर बस चालवणे अधिक अवघड झाले. ५० टक्क्यांहून अधिक मुले स्कूल बसमध्ये बसणार नाहीत, आताही बहुतेक शाळा फक्त दहावीच्या मुलांनाच बोलवत आहेत. अहमदनगर वगैरे ठिकाणी अजूनही लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत बस सुरू झाल्यावर पुन्हा थांबवण्यात येणार नाहीत याची हमी कोण देणार? तसेच मास्क मुले विसरतील, हरवतील त्यांना आम्ही कसे पुरवणार? रोज त्यांचे तापमान तपासणे वगैरे कामे अवघडच जातील. तसेच नेहमीच्या मुलांसाठी दुप्पट संख्येने बस पुरवणे अशक्यच जाईल.
स्कूल बस ऑपरेटर्सचे अनिल गर्ग म्हणाले की, “स्कूल बस १३ सीटर ते ५० सीटर उपलब्ध आहेत. शाळांमध्ये आधीच विद्यार्थी कमी आहेत, आता कल्पना करा की जर एखाद्या सोसायटीतील ८ मुलांना बस मधुन घेऊन जायचे असेल तर सोशल डिस्टंसिंग मुळे दोन बसेस लागतील. बसेस वापरण्याआधी आणि वापरल्यानंतर सॅनिटायझ करणे आवश्यक आहे असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. परंतु एकदा सॅनिटायझ केल्यानंतर रसायनांचा प्रभाव कमी होण्यासाठी अर्धा तास वाट पाहणे बंधनकारक असते. असा परिस्थितीत बसेस वेळेवर कशा उपलब्ध होतील तसेच बसेसच्या देखभालीचा खर्चही वाढेल.”