मुक्तपीठ टीम
अजित पवार निकटवर्तियांवरील धाडींबद्दल आयकर खात्यानं अद्याप अधिकृत माहिती त्यांच्या उल्लेखासह दिलेली नाही. मात्र, गुरुवारी रात्री उशिरा आयकर खात्यानं एक प्रेसनोट जारी केली आहे. या प्रेसनोटमधील माहिती खळबळजनक आहे. अजित पवारांचा किंवा अन्य कुणाच्याही नावांचा उल्लेख नसलेल्या त्या प्रेसनोटनुसार, आयकर विभागाकडून २३ सप्टेंबर रोजी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील काही उद्योगपती, दलाल आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून याबाबतची माहिती गुप्तचरांकडून घेतली जात होती. या छाप्यांदरम्यान एकूण २५ निवासी आणि १५ कार्यालयांवर छापे घालण्यात आले तर ४ कार्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. या प्रेस नोटमध्ये १ हजार ५० कोटी रुपयांच्या व्यवहाराची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रेसनोटमध्ये नावांचा उल्लेख नाही, त्यामुळे ती नेमकी कोणत्या महासिंडिकेटबद्दल अशी चर्चा सुरु झाली आहे. पण ती जारी झाली त्याच दिवशी गुरुवारपासून अजित पवारांशी संबंधित कारखान्यावर, मुलगा पार्थ, त्यांच्या बहिणींच्या घरी आणि निकटवर्तीयांकडे आयकर विभागाचं धाडसत्र सुरु आहे.
महाराष्ट्रातील महासिंडिकेटची धक्कादायक माहिती
- प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रातील विशिष्ट उद्योगपती/ मध्यस्थ आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या एका मोठ्या वर्तुळावर छापे घातले.
- या छाप्यांची सुरुवात २३.०९.२०२१ पासून झाली होती.
- सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून याबाबतची माहिती गुप्तचरांकडून घेतली जात होती.
- या छाप्यांदरम्यान एकूण २५ निवासी आणि १५ कार्यालयांवर छापे घालण्यात आले तर ४ कार्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले.
‘
सचिन वाझेने बुक केलेल्या ओबेरॉय हॉटेलमध्येच महारॅकेटनेही बुक केले सुट्स!
- मुंबईमधील ओबेरॉय हॉटेलमधील काही सुट्स या मध्यस्थांपैकी दोघांनी कायमस्वरुपी भाड्याने घेतले होते आणि त्यांच्या ग्राहकांची भेट घेण्यासाठी त्यांचा वापर केला जात होता.
- या सुट्सची देखील तपासणी करण्यात आली.
सांकेतिक खुणांचा वापर करून एक हजार ५० कोटींचे व्यवहार!
- मध्यस्थ आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या या वर्तुळाकडून आपल्या दस्तावेजांमध्ये विविध गोपनीय सांकेतिक खुणांचा वापर केला जात होता.
- काही दस्तावेज तर १० वर्षांपूर्वीचे होते.
- या शोधमोहिमेत एकूण १०५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळले.
- संपर्कासाठी अतिशय गोपनीय असलेली एन्क्रिप्टेड माध्यमे आणि माहिती नष्ट करणारी उपकरणे वापरली जातात.
- प्राप्तिकर विभागाला त्यातून महत्त्वाची डिजिटल माहिती पुन्हा मिळवण्यात यश मिळाले.
शेतकऱ्यांकडून जमिनींची खरेदी, सरकार आणि उद्योगांना पुरवून बेहिशेबी मालमत्ता!
- हे मध्यस्थ कॉर्पोरेट आणि उद्योगपतींना भूमी हस्तांतरित करून देण्यापासून ते सर्व प्रकारच्या सरकारी मंजुरी मिळवून देण्यापर्यंत एन्ड टू एन्ड सेवा उपलब्ध करून देत होते.
- त्यातून विविध बेकायदेशीर कृत्यांचे पुरावे असलेल्या छुप्या जागेची देखील माहिती मिळाली. रोख रक्कम पाठवण्यासाठी या मध्यस्थांनी आंगडियांचा देखील वापर केला.
- तपासादरम्यान या आंगडियांपैकी एकाकडून सुमारे दीड कोटी रुपये जप्त करण्यात आले.
- त्याशिवाय एका उद्योगपतीने/मध्यस्थाने शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी केल्या.
- त्यानंतर त्यांचे हस्तांतरण सार्वजनिक उपक्रम आणि मोठ्या कॉर्पोरेटना करून मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी उत्पन्न जमा केल्याचे देखील तपासात आढळले.
वरिष्ठ सनदी अधिकारी, नातेवाईक, प्रमुख व्यक्तींची गुंतवणूक
- अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी/त्यांचे नातेवाईक आणि इतर प्रमुख व्यक्तींनी या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याचे दिसून आले.
- चौकशी केलेल्या व्यक्तींपैकी काहीजण स्थावर मालमत्ता आणि बांधकाम व्यवसायात असल्याचे आढळले.
- याविषयीचे रोख रकमेच्या पावत्या आणि चुकाऱ्यांचे पुरावे आढळले.
साडे चार कोटी रोकड आणि पावणेचार कोटीचे दागिणे जप्त!
- जप्त केलेले मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह्ज, आयक्लाऊड, ई-मेल्स इत्यादींमधून मोठ्या प्रमाणावर डिजिटल माहिती मिळाली असून त्याची तपासणी आणि विश्लेषण सुरू आहे.
- आतापर्यंत ४.६ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि ३.४२ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
- या तपासादरम्यान सापडलेले ४ लॉकर प्रतिबंधात्मक आदेशाखाली आहेत. पुढील तपास सुरू आहे.