मुक्तपीठ टीम
पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि पीनजीपाठोपाठ आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. सर्व सामान्यांना महागाईचा तडाखा बसला आहे. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती ६ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा वाढवण्यात आल्या आहेत. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी केवळ १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबईत विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८४४.५० रुपयांवरुन ८९९.५० रुपये इतकी झाली आहे.
कोलकातामध्ये ९२६ आणि चेन्नईमध्ये १४.२ किलो घरगुती गॅस सिलिंडर आता ९१५.५० रुपयांना उपलब्ध होईल. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती पाहता यावेळी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १००० रुपयांच्या पुढे जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
१ सप्टेंबर रोजी १४.२ किलोच्या विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. यापूर्वी, १८ ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांनी वाढ केली होती. गेल्या एका वर्षात दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३०५.५० रुपयांची वाढ झाली आहे.
जुलै आणि ऑगस्टमध्ये किंमती वाढवण्यात आल्या होत्या. मे आणि जूनमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. एप्रिलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत १० रुपयांची कपात करण्यात आली होती. दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत या वर्षी जानेवारीमध्ये ६९४ रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढवून ७१९ रुपये प्रति सिलिंडर झाली. १५ फेब्रुवारीला किंमत वाढवून ७६९ रुपये करण्यात आली. यानंतर, २५ फेब्रुवारी रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होऊन ७९४ रुपये झाली. मार्चमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८१९ रुपयांपर्यंत कमी करण्यात आली.