मुक्तपीठ टीम
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या सेवा विस्कळीत झाल्याने सोमवारी ४ ऑक्टोबरला जगभरातील युजर्स त्रस्त झाले. यामुळे फेसबुकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती काही तासांत ६.११ अब्ज डॉलर्सनी कमी झाली. जगातील श्रीमंतांच्या यादीत झुकरबर्ग पहिल्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर आले आहेत. सेवा विस्कळीत झाल्यामुळे लाखो वापरकर्त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल झुकरबर्गने माफी मागितली. यातही एक गंमतीदार बाब अशी की, सेवा डाऊन झाल्यानंतर जगभरातील अब्जावधी यूजर्सशी संपर्कासाठी फेसबूक समुहाला प्रतिस्पर्धी ट्विटरचाच आधार घ्यावा लागला.
सोमवारच्या रात्री असं काय घडलं?
- ४ ऑक्टोबर सोमवारी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या सेवा विस्कळीत झाल्या.
- त्यामुळे जगभरातील युजर्स त्रस्त झाले.
- या समस्यांमुळे फेसबुकचे शेअर्स ४.९ टक्क्यांनी घसरले.
- सप्टेंबरच्या मध्यापासून कंपनीचा शेअर सुमारे १५ टक्के घसरला आहे.
बिल गेट्सच्या खाली घसरली मार्क झुकेरबर्ग यांची श्रीमंती!
- ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स नुसार, झुकेरबर्ग यांची संपत्ती ६.११ अब्ज डॉलर ने कमी होऊन १२२ अब्ज डॉलर झाली आहे.
- काही दिवसांपूर्वी झुकरबर्ग १४० अब्ज डॉलरच्या संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होते.
- पण आता ते पुन्हा बिल गेट्सच्या मागे गेले आहेत.
- १२४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह बिल गेट्स या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.
फेसबुकला ट्विटरचा आधार!
सेवा पूर्ववत झाल्यानंतर फेसबुकने ट्विटरवर म्हटले की, ‘जगभरातील लोक आणि व्यवसाय जे आमच्यावर अवलंबून आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. आम्ही आमची अॅप्स आणि सेवा पूर्णपणे पूर्वीसारखी सक्रिय करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत. सर्व सेवा पुन्हा ऑनलाइन आल्याचे कळवण्यात आम्हाला आनंद होत आहे. आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद.