मुक्तपीठ टीम
राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयांचे इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करण्यासाठी चार्टर्ड इलेक्ट्रिकल सेफ्टी इंजिनियर्सची त्वरित नियुक्ती करावी व लवकरात लवकर शासकीय रूग्णालयांचे इलेक्ट्रिकल ऑडिट करावे, अशी मागणी ऊर्जा खात्याचे माजी संचालक विश्वास पाठक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
९ जानेवारी २०२१ रोजी भंडारा येथील शासकीय रूग्णालयात आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि अनेक नेत्यांनी रुग्णालयाला भेटी दिल्या. यावेळी सरकारकडून घोषणा करण्यात आली की, राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयांचे दरवर्षी इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करण्यात येईल.
पाठक म्हणाले की, इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट विषयी केंद्रीय विद्यूत प्राधिकरणाने ‘इज ऑफ डूइंग बिझनेस’ च्या अंतर्गत चार्टर्ड इलेक्ट्रिकल सेफ्टी इंजिनियर्सची नेमणूक करण्याविषयी मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. त्यानुसार, हे इंजिनियर सर्व प्रकाराच्या वीज संच मांडणीचे निरीक्षण करण्यास जबाबदार राहतील. मात्र, महाराष्ट्र शासनाने आजतागायत एकाही चार्टर्ड इलेक्ट्रिकल सेफ्टी इंजिनियरची नेमणूक न केल्याने अशा प्रकारचे ऑडिट करण्यास अडचणी येत आहेत. राज्य सरकारच्या अस्तित्वात असलेल्या नियमावलीनुसार केवळ ११ केव्ही व्होल्टेजपर्यंत असलेल्या संस्थांचे ऑडिट करण्यासाठी चार्टर्ड सेफ्टी इंजिनियरला मान्यता दिली आहे.
११ केव्ही हून अधिक व्होल्टेज असलेल्या संस्थांना अशा प्रकारचे ऑडिट करण्यासाठी विद्युत निरीक्षकाकडे जावे लागते जे अतिशय त्रासाचे, खर्चिक व व्यवहारीक नसल्याने भंडाऱ्यासारख्या घटना घडतात म्हणून मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिकरीत्या ताबडतोब लक्ष घालून चार्टर्ड इलेक्ट्रिकल सेफ्टी इंजिनियर्सची नेमणूक करावी व राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयाचे ऑडिट करावे, असे पाठक यांनी पत्रकात नमूद केले आहे.