मुक्तपीठ टीम
बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या रणरागिनी ममता बॅनर्जी यांचा विजय झाला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघात ५८ हजार ८३२ एवढ्या विक्रमी मताधि्क्याने विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांचा सपशेल पराभव केला. या मतदारसंघातील विजयामुळे ममता बॅनर्जीची भवानीपूरमधून हॅटट्रिक झाली आहे.
ममता बॅनर्जी गेल्या दोन निवडणुका त्यांच्या घरच्या भवानीपूर मतदारसंघामधून जिंकत होत्या. पण विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवली होती. त्यांच्या पक्षातून फुटून भाजपात गेलेल्या शुभेंदू अधिकारी यांनी त्यांना आपल्या बालेकिल्ल्यात पराभूत केले होते. पण त्याच विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने भाजपला चिरडले. ममतांच्या पक्षाने २२३ जागा जिंकल्या आणि ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या.
भाजपच्या प्रियंका टिबरेवाल आणि माकपचे जीब बिस्वास यांना खूपच कमी मतं मिळाली आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघात भाजपाच्या प्रियांका टिबरेवाल आणि माकपकडून जीब बिस्वास यांच्याशी सामना आहे. मे महिन्यात झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्या. त्यामुळे मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी त्यांना या जागेवरून जिंकणे आवश्यक आहे. सहा महिन्यांच्या आत विधानसभेचे सदस्य होणे त्यांच्यासाठी अनिवार्य होते. आजच्या दणदणीत विजयामुळे आता त्या कसल्याही बाधेविना कार्यरत राहू शकतात.