महाराष्ट्राचे गुणवान बालक कामेश्वर वाघमारे, काम्या कार्तिकेयन, अर्चित पाटील, सोनित सिसोलेकर आणि श्रीनभ अग्रवाल यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले.
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्यावतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी देशातील ३२ बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१’ साठी निवड केली. यात महाराष्ट्रातील नांदेड येथील कामेश्वर वाघमारे (१४), मुंबई येथील काम्या कार्तिकेयन (१३), जळगाव येथील अर्चित पाटील(१४), पुणे येथील सोनित सिसोलेकर (१३) आणि नागपूर येथील श्रीनभ अग्रवाल (१६) या मुलांचा समावेश आहे. पदक, १ लाख रूपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नांदेड येथील कामेश्वर वाघमारे याची शौर्य श्रेणीत या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाली. मनार नदित पोहायला गेले असता बुडणाऱ्या दोन मुलांना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांचा जीव वाचविला होता.
मुंबई येथील काम्या कार्तिकेयन हिची क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. १३ वर्षीय पर्वतारोही काम्या कार्तिकेयन ही मिशन साहस या विशेष मोहिमेंतर्गत काश्मिरमध्ये विशेष प्रशिक्षण घेत असून तिला एक्सप्लूरस ग्रँडस्लॅम सर करून जगातील सर्वात कमी वयाची पर्वतारोही म्हणून देशाचे नाव उंचवायचे आहे.
अर्चित पाटील याची नव संशोधन श्रेणीत निवड झाली आहे. साधारण यंत्रांचा उपयोग करून अर्चित याने तयार केलेल्या उपकरणाद्वारे बाळंतपणात होणाऱ्या रक्तस्त्रावाची अचूक माहिती जाणून घेता येते.
पुणे येथील सोनित सिसोलेकर याची ज्ञानार्जन श्रेणीत निवड झाली असून त्याने रेडिओलॉजीच्या प्रभावी परिणामावर संशोधनात्मक अभ्यास केला आहे. नासा या आंतरराष्ट्रीय संघटनेनेही त्याच्या कार्याचा गौरव केला आहे. नागपूर येथील श्रीनभ अग्रवाल याची नवसंशोधन श्रेणीत निवड झाली आहे. श्रीनभ याने पिकांवर येणा-या यलो मोझॅक विषाणुला नष्ट करण्यासाठी कंबरमोडी या वनस्पतीच्या पानांपासून प्रभावी औषध तयार केली आहे.
पंतप्रधानांचे मार्गदर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्राप्त मुलांशी संवाद साधला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी देखील यावेळी उपस्थित होत्या.
पुरस्कार विजेत्यांनी कोरोनाच्या कठीण काळात हे पुरस्कार मिळविल्याने यावर्षीचे पुरस्कार विशेष आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. संवादादरम्यान पंतप्रधानांनी, वागणुकीत मोठा बदल घडवून आणणाऱ्या स्वच्छता अभियानासारख्या मोहिमेतील मुलांच्या भूमिकेचे कौतुक केले. कोरोना काळात जेव्हा मुले हात धुण्यासारख्या मोहिमांमध्ये सामील झाली तेव्हा याचा सकारात्मक परिणाम लोकांवर झाला आणि या मोहिमेला यश मिळाले असे पंतप्रधान म्हणाले. यावर्षी ज्या क्षेत्रांमध्ये पुरस्कार देण्यात आले आहेत त्यातील विविधताही पंतप्रधानांनी नमूद केली.