डॉ. जितेंद्र आव्हाड
मैं तहजीब (सभ्यता), तमद्दुन (संस्कृती) और सोसायटी की चोली क्या उतारूंगा; जो है ही नंगी. मैं उसे कपडे पहनाने की कोशीश भी नहीं करता, क्यौंकी यह मेरा काम नहीं; दर्जियों का काम है.’ जगविख्यात उर्दू कथाकार सआदत हसन मंटो यांचे हे उद्गार. समाजाचा चेहरा समाजासमोर आहे तसा ठेवणारे, त्या चेहऱ्यामधील नग्न भीषणता, त्यातील क्रौर्य समोर मांडणारे असे जे लेखक असतात, त्यांना बंडखोर म्हणतात. त्यांनी हे लपवून का नाही ठेवले, असे त्यांना विचारले जाते आणि अश्लील ठरवले जाते. मंटोंवर तसे शिक्के मारले गेले. सहा वेळा त्यांच्यावर अश्लील वाङ्मयनिर्मिती केल्याचा आरोप ठेवून खटले भरण्यात आले. ते खटले भरणारे हरले. ते शिक्के मारणारे काळाच्या पाटीवरून केव्हाच पुसले गेले. मंटो होते तसेच आहेत. बंडखोर, सुधारणावादी, मानवतावादी. आपल्या कथांनी रसिकांना घायाळ करणारे आणि वर हे बजावून सांगणारे, की समाजाच्या ज्या कालखंडातून आपण चाललो आहोत, त्याच्याशी आपला परिचय नसेल, तर माझ्या कथा वाचा आणि ‘अगर आप इन अफसानों को बर्दाश्त नहीं कर सकते, तो यह जमाना नाकाबिल-ए-बर्दाश्त है.’
मंटोचा जन्म १९१२ मधला. लुधियानातला. वडील न्यायाधीश होते त्यांचे. त्यांच्या लेखन कारकिर्दीची सुरुवात झाली पत्रकारितेपासून. लुधियानातल्या ‘मसावत’ नावाच्या दैनिकात ते काम करीत असत. त्यानंतर त्यांनी अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. दुसरीकडे जागतिक अभिजात वाड्मयाचे वाचन सुरूच होते. चाळीसच्या त्या दशकात ‘अंजुमने तरक्की पसंद मुस्लनफिन-ए-हिंद’ म्हणजेच भारतीय प्रगतीशील लेखकांची संघटना (आयपीडब्लूए) उभारी घेत होती. ही डाव्या विचारांची, स्वातंत्र्यवादी लेखकांची चळवळ. मंटो तिच्याकडे आकर्षिले गेले. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले पर्व.
दुसरे पर्व सुरू झाले मुंबईत. २४ वर्षांचे होते तेव्हा ते. वडील गेले होते. आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. अशात त्यांना मुंबईहून एक नोकरीची संधी प्राप्त झाली. तिथे नझीर लुधियानवी यांनी एक वृत्तपत्र सुरू केले होते. ‘मुसव्विर’ त्याचे नाव. भायखळा-नागपाड्याच्या क्लेअर रोडवरून निघायचे ते. त्याचे संपादकपद त्यांनी मंटोंना देऊ केले होते. त्यासाठी १९३५ च्या सुमारास ते मुंबईत आले. येथे राहण्याची सोय नव्हतीच. त्यामुळे सुरूवातीला काही दिवस त्यांनी वृत्तपत्राच्या कार्यालयातच तळ ठोकला. नंतर त्यांना एक खोली मिळाली, ग्रॅंट रोडवरील अरब गल्लीतील एका चााळीत. त्यांच्या ‘पीरन’ या कथेत त्याचे वर्णन येते. ते सांगतात, खोलीत पाणी नव्हतं की विज; पण नऊ रुपये आठ आणे भाडं देत होतो तिचं. इमारत तर भयंकर होती. छतातून भयंकर किडे पडायचे खाली. सर्वत्र उंदीर फिरायचे. असे उंदीर कधी पाहिले नव्हते मी. एवढे मोठे होते की, मांजरीही घाबरायच्या त्यांना.’
हे तेव्हाच्या मुंबईचे एक रूप ही मुंबई होती कामगारांची, श्रमिकांची. गावाकडे आपले बिऱ्हाड ठेवून आलेल्या, ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतेय काहिली’ अशी अवस्था असलेल्या एकेकट्या कष्टकऱ्यांची. १९२१ सालची जनगणना सांगते, की मुंबईतला तेव्हाचा ८२ टक्के कामगारवर्ग हा बाहेरून आलेला होता. ग्रॅंट रोडनजीक देहव्यापार फुलला होता तो त्यातील अनेकांसाठी. मंटो ते पाहत होते. ते वातावरण, तेथील शोषण, स्त्रीचे झालेले वस्तुकरण, त्या स्त्रियांच्या वेदना हे सारे एकीकडे आणि त्याच वेळी धार्मिक राजकारणाने घेतलेले हिंस्त्र वळण दुसरीकडे. त्यांच्या संवेदनशील मनावर त्याचे घाव पडत होते. प्रतिभावंत मन अस्वस्थ झाले होते. ही अवघी मुंबई कागदावर कथा बनून उतरत होती. पुढे त्यांना ‘मुंबईचे बखरकार’ म्हंटले गेले ते त्यामुळेच. आतापर्यंत ‘तहजीब आणि तमद्दुन’ मध्ये अडकलेल्या, ‘इश्क आणि आशुक-माशुक’मध्ये गुंतलेल्या उर्दू साहित्याला ते सारेच नवे होते. उर्दूच्या पारंपरिक साहित्यविश्वालाच नव्हे, तर स्वतःला ‘तरक्की पसंद’ म्हणवणाऱ्या लेखकांनाही सणसणीत धक्के देणाऱ्या अशा त्या कथा होत्या.
पण, या मुंबईचे आणखीही एक रूप होते. ही मुंबई ‘नगरी बडी बांका’ही होती. मायानगरी होती. चित्रनगरी होती. लोकांच्या आयुष्यावरील चित्रपटांचा प्रभाव मंटो ओळखून होते. त्या चित्रपटांना तोवर साहित्याचे वावडे नव्हते. मंटोसारख्या प्रतिभावंतांना तिने आकर्षीले नसते, तर नवलच. ते आता चित्रपटांसाठी लिहू लागले. १९३७ साली ‘किसान कन्या’ हा ‘इंपिरियल’ स्टुडिओचा पहिला हिंदी रंगीत चित्रपट आला. त्याचे संवादलेखन मंटोंनी केले होते. त्यानंतर दोनच वर्षांनी लाहोरमधील साफिया या तरुणीशी मंटोंचा विवाह झाला. विवाहानंतर मंटोंनी अरब गल्ली सोडून क्लेअर रोडवरील अडेल्फी चेंबरमध्ये बिऱ्हाड हलवलं. आता त्या इमारतीच्या जागी इस्माईलिया सोसायटी उभी आहे. हे घर मोठे होते, पण अवस्था तशीच. त्यांचा हा नवा संसार पाहायला जेव्हा त्यांची आई आली, तेव्हा ती अवस्था पाहून रडायलाच लागली ती. काही दिवसांनी तिचे निधन झाले. मंटोंना एक मूल झाले; पण काही दिवसांतच तेही गेले. त्या दु:खाने कोसळलेच ते. मुंबईत मन रमेना. तसे ते दिल्लीला गेले. ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या उर्दू विभागात त्यांना नोकरी मिळाली.
पण, आता अंगात मुंबई भिनली होती. १९४२ ला ते परतले. ‘मुसव्विर’ मधील काम पुन्हा सुरू केले. चित्रपटांसाठी लिहू लागले. अशोककुमार, श्याम, अभिनेत्री नसीम बानो ही तेव्हाची त्यांची जवळची मित्रमंडळी. या काळात कथालेखन तर सुरूच होते. कामाठीपुरा, नागपाडा, ग्रॅंट रोड, तेथील देहव्यापार यांतून ओघळणारे समाजाचे किळसवाणे रूप त्या कथांतून भगभगीतपणे समोर येत होते. ‘काली लवार’, ‘बू’, ‘धून’ यांसारख्या कथांनी समाजातील श्लीलतेचे ठेकेदार अस्वस्थ होत होते. मंटोंवर अश्लील लेखनाचे आरोप होऊ लागले होते. काहीं अश्लीलमार्तंडांनी तर खटलेही गुदरले; पण त्याला मंटो पुरून उरले.
एव्हाना मुंबईतही फाळणीची आग पसरू लागली होती. एकदा तर जवळच्या रस्त्याने जाण्याच्या नादात ते आणि अशोककुमार एका मुस्लिम गल्लीत सापडले. वातावरण गरम होते. काहीही होऊ शकले असते; पण जमावाने अशोककुमार यांना ओळखले आणि सुखरूप जाऊ दिले. या अशा घटनांनी, धार्मिक दंगलींनी, त्यातील क्रौर्याने मंटो मुळापासून हादरत होते. हा देश त्यांचा होता. ही मुंबई त्यांची होती. फाळणी झाली. त्यांची पत्नी, मुले तेव्हा लाहोरमध्ये होती. त्यांच्यासाठी त्यांना पाकिस्तानात जावे लागले. ते लिहितात – हिंदुस्थान स्वतंत्र झाला. पाकिस्तान जन्मापासूनच स्वतंत्र झाले. पण या दोन्ही देशातील माणसं अजून गुलामच होती… गुलाम त्यांच्या पुर्वग्रहांची, गुलाम अतिरेकी धर्मवादाची… गुलाम पाशवीपणाची आणि अमानवीपणाची.
फाळणीतून वर आलेले पाशवीपण आता त्यांच्या कथांचा विषय बनले होते. ‘ठंडा गोश्त’, ‘जाने दो’ यांसारख्या त्यांच्या कथा समाज आणि माणसाच्या मनातील क्रौर्याचा छुपा चेहरा समोर आणत होते आणि त्यातील वास्तव्याच्या दर्शनाने भयलज्जित झालेले समाजमन त्या कथांना अश्लील ठरवत होते…
आजही ते चित्र बदललेले नाही. मुंबईचा, तेथील चाळींचा, चमचमाटाचा, वेश्यावस्त्यांचा, तेथील अंधाराचा… हेच नव्हे, तर अवघ्या समाजमनाचा हा बंडखोर बखरकार आता या जगात नाही पण जगमान्य बनलेला आहे; पण त्यांच्या कथांची समकालीनता काही कमी झालेली नाही…..
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)
रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर: गिनीज बुककडून नोंद, पण मराठी साहित्यविश्वाचे दुर्लक्ष!