मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशात चार वेळा मुख्यमंत्री पद मिळालेल्या बसपा नेतृत्वाने दलितांच्या विकासासकडे न्याय हक्कांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बसपावरील दलितांचा विश्वास उडाला आहे. बसपाचे दलितांकडे लक्ष नाही. केवळ निवडणुकीत दलित मतांचा केवळ वापर करण्याकडे बसपाचे लक्ष आहे. त्यामुळे बसपा ला हद्दपार करून उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविणार असा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित बहुजन कल्याण यात्रेचा शुभारंभ सहारणपुर येथे रामदास आठवले यांच्या नेतृत्वात करण्यात आला. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते.
रिपाइं ची बहुजन कल्याण यात्रा रिपाइं चे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबर ते १८ डिसेंबर पर्यंत उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांमध्ये फिरून १८ डिसेंबर ला लखनौ येथील माता रमाई आंबेडकर मैदानात विशाल जन सभे द्वारे समारोप करण्यात येणार आहे. बहुजन कल्याण यात्रेच्या शुभारंभ सहारनपुर येथील जन मंच ऑडिटोरियम येथे जाहीर सभेद्वारे करण्यात आला. यावेळी रिपाइं चे पवन गुप्ता ;जवाहर लाल ; राहुलन आंबेडकर; राकेश सिंह; अशोक शर्मा; अरविंद मौर्या; यशपाल सिंह; मंजुल लांबा; रुची सागर; शिवकुमार गौतम; आनंद प्रकाश;जयंत चौधरी; हाजी इमरान सलमानी;रीना राणी; आदी मान्यवर उपस्थित होते.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ रोजी करण्यात आली. बहुजन समाज पक्षाचा जन्म होण्याआधी उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्ष प्रबळ होता. मात्र उत्तर प्रदेशातून रिपब्लिकन पक्षाला हद्दपार करून बसपाने रिपाइं चे स्थान मिळविले. मात्र आता आमचा निर्धार आहे की उत्तर प्रदेशातून बसपाला हद्दपार करून आरपीआय चा निळा झेंडा आम्ही फडकविणार असे रामदास आठवले म्हणाले.
उत्तर प्रदेश च्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत आरपीआयची युती बाबत बोलणी सुरू आहेत. बहुजन कल्याण यात्रे द्वारे उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे शक्तिप्रदर्शन घडविण्यात येणार आहे. त्यानंतर भाजप रिपाइं युतीचा निर्णय निश्चित होईल. भाजप आरपीआय युती झाल्यास उत्तर प्रदेशात भाजप ला ३०० पेक्षा जास्त जागा जिंकता येतील असा अंदाज रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेशात रिपाइं तर्फे आज सहारनपुर येथून सुरू केलेल्या बहुजन कल्याण यात्रेत रामदास आठवले सहारनपुर ; आग्रा; झांशी; वाराणसी; कुशीनगर आणि लखनौ येथील सभांना संबोधित करणार आहेत.
बहुजन कल्याण यात्रे द्वारे संपूर्ण उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे प्रचंड शक्तिप्रदर्शन घडविणार असल्याचा निर्धार रामदास आठवले यांनी व्यक्त केला.