सुमेधा उपाध्ये
चराचरात जे चैतन्य व्यापून उरलेलं आहे तेच आपल्यातही आहे. ही जाणीव आहे पण मायेच्या अधीन असलेल्या जीवाला सर्वत्र द्वैताचा भास होत राहतो. वेदांमधील ज्ञानाच्या सहाय्याने असंख्य विद्वानांनी स्वत:च्या विचार प्रणालीनुसार विविध त-हेने द्वैत अद्वैत तत्वज्ञानाची मांडणी केली. पण त्यानी शेवटी मान्य केलं की कितीही वर्णन केलं कितीही खोल संशोधन केलं तरीही एक असं काही आहे की जे वर्णनांच्या पलिकडे आहे. त्या ईश्वराला जाणणं त्याची लीला समजून घेणं हे शिल्लक राहतंच. त्या ईश्वराने हा सृष्टीचा पसारा मांडला यात मानव हा प्रगत प्राणी निर्माण केला आणि त्याला सांगितलं आता तू मला म्हणजेच ईश्वराला शोध. असं आव्हान देऊन तो ईश्वर प्रत्येकाच्या आत लपून बसला.
युगानुयुगे त्याचा शोध करीत आहोत अनेक जन्म खर्ची पडले तरीही तो सर्वांनाच सापडत नाही. कारण अनेकदा आपण बाहेरचं जग शोधत राहतो आणि आपलं घर आपण बघत नाही. इथं आपलं घर म्हणजे हे शरीर आहे. आपल्या आत एक चैतन्य आहे तेच चैतन्य या सृष्टीतल्या कणाकणात अणू रेणूत आहे. हे सर्व एक आहे. पण तेच आपल्याला वेगवेगळं वाटतं तसंच आपलं शरीर मन आत्मा हे ही आपल्याला वेगवेगळं वाटत राहतं. आपण त्याच्या पलिकडे आत खोल डोकावत नाही तेवढी स्वस्थता आपल्यात नाही आणि मग तितकेच त्या ईश्वरापासून दूर जातोय.
चैतन्य म्हणजेच ही प्राणशक्ति आहे म्हणूनच योग शास्त्रात प्राणायामाला महत्व आहे. आपल्या श्वासांवर लक्ष दिलं पाहिजे. स्वत:ला स्वत:च सोडून दिलं पाहिजे. एका आसनात स्वस्थ बसलं पाहिजे आणि आपल्या शरीरात सळसळत जाणारा हा श्वास हा प्राण नेमका कुठे कसा जातो आणि काय करतो हे तटस्थपणे पाहिलं पाहिजे. आपल्या प्राणाच्या येण्या जाण्यावर लक्ष ठेवून त्यात मग्न झालो तर हळू हळू आपला आतला प्रवास सुरू होऊ शकतो. चैतन्याच्या असण्याची जाणीव होते. मग आपली धडपड थोडी शांत होत जाते. सर्व चित्त एका ठिकाणी स्थीर झाल्याने आपल्याला आपल्या असण्याची गंमत समजते. यासाठीच प्रत्येकाने आपल्या आतील आवाज ओळखण्यासाठी थोडं थोडं स्वस्थ बसायला हवं. मायेच्या जाळ्यात जास्त न अडकता जे शाश्वत आहे जे एक चैतन्य सर्वत्र व्याप्त आहे त्याची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे ज्ञानी आहेत ते अशा आत्मज्ञानास प्राप्त होतात. मग त्यांना या संसाराशी या मायेशी काहीच संबंध ठेवावा असं वाटत नाही. यासाठीच अवधूत गीतेत स्वत: भगवान दत्तात्रेयजी सांगतात-
मनो न बुद्धिनं शरीरमिन्द्रियं,
तन्मात्रभूतानि न भूतपंचकम|
अहंकृतिश्चापि वियत्स्वरूपकं,
तमीशमात्मानमुपैति शाश्वतम् ||
याचा अर्थ असा की ज्ञानी अशा आत्मरूपास प्राप्त होतात की जे मन बुद्धी शरीर इंद्रिय तन्मात्रा (शब्द स्पर्श रूप रस गंध) तसंच पंच महाभूत ( पृथ्वी जल अग्नि वायू आकाश) तसंच अहंकार या सर्वापासून दूर होतात. विरक्त होतात. फक्त त्या शुद्ध चैतन्यात तल्लिन होतात. ते आकाशा सारखे व्यापक होतात. जे आकारहिन रंग हिन गंधहिन आहेत. कर्माचेही बंधन नाही. खरे आत्मज्ञानी असेच होतात. सर्वांनाच ईश्वराने सारखेच शरीर दिले आहे. मन बुद्धी इंद्रिये सर्व आहेच तरीही चैतन्याशी तादात्म्य पावण्याची ईच्छाही सर्वसामान्य व्यक्ति मायेच्या अधीन राहून करत नाही. मानवाच्या उद्धारासाठी आणि त्या योगे या विश्वाच्या कल्याणासाठी या ईश्वराने जे कार्य सोपवले आहे ते सोडून आपण सर्वांचा शोध घेत आहोत. भौतिक विकासाच्या स्पर्धेत अधिक गुंतत आपल्या आत्मोद्धाराची दारं मात्र बंद करून बसलो आहोत. प्रत्येक मनुष्याच्या उन्नतीसाठी त्या चैतन्य शक्तिची ओळख करून घेतली पाहिजे. तिच्या समीप जाण्याचा केवळ प्रयत्न जरी सुरू झाला तरीही मनुष्य जन्माचीसार्थकता आहे.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत)