मुक्तपीठ टीम
राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्यावेळी सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला होता. यावेळी विरोधीपक्ष भाजपाच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. दरम्यान या निलंबित १२ आमदारांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आता या आमदारांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. पण निलंबन काळात आमदार विधानभवनाच्या आवारात प्रवेश करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्या मतदानासाठी आवाराबाहेर खास मतदान कक्ष उभारण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.
निलंबितांचे मतदान, आवाराबाहेर मतदान कक्ष!
- काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राज्यात पोटनिवडणूक होणार आहे.
- निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली होती.
- ४ ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे.
- दरम्यान, या पोटनिवडणूकीत भाजपाचे निलंबित बारा आमदार देखील मतदान करु शकणार आहेत.
- भारतीय निवडणूक आयोगाने १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधिमंडळ प्रशासनाला भाजपाच्या निलंबित बारा सदस्यांसाठी मुंबईतील विधान भवनाच्या परिसराबाहेर मतदानासाठी स्वतंत्र बूथ स्टेशनची तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत.
का झालं होते आमदार निलंबित?
- इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशनावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता.
- सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली होती. त्याचबरोबर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.
- या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं.
- त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूर करण्यात आला होता.
- या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
हे आहेत निलंबित बारा आमदार!
- आशिष शेलार
- योगेश सागर
- अभिमन्यू पवार
- संजय कुटे
- अतुल भातखळकर
- पराग अळवणी
- गिरीश महाजन
- राम सातपुते
- हरीश पिंपळे
- नारायण कुचे
- जयकुमार रावत
- किर्तीकुमार भांगडिया