डॉ.जितेंद्र आव्हाड
माणसे जगण्यासाठी महानगरी मुंबईत येतात. यातील जगणे याचा अर्थ पोट भरण्यासाठी, नोकरीच्या शोधासाठी, असा असतो. बाबुराव बागुल हे मात्र अक्षरशः जगण्यासाठी या शहरात आले होते. सर्जनशील साहित्यिक,विद्रोही साहित्य चळवळीचे एक प्रवर्तक अशी त्यांची ओळख. ते मूळचे नाशिक जिल्ह्यातल्या विहितगावचे. जन्म १७ जुलै १९३० चा. त्यांच्याआधीची भावंडे जगली नाहीत. आता ते तरी जगावेत, शिकावेत या विचाराने बाबूरावांच्या वडिलांनी त्यांना मुंबईतल्या मावशीकडे पाठवून दिले. ती राहायची माटुंग्याच्या लेबर कॅम्पमध्ये. त्या ठिकाणी आता ८ क्रमांकाची इमारत उभी आहे. तेथील महापालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले.
त्या सुमारास आंबेडकरी क्रांती विचारांचे वादळ उठू लागले होते. त्याचा परिणाम शालेय वयात असलेल्या बागुल यांच्यावरही झाला. चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शालेय शिक्षण थांबवावे लागले; जीववशिक्षण मात्र सुरूच होते. माटुंगा लेबर कॅम्पसारखे विद्यापीठ त्यासाठी होतेच. या लेबर कॅम्पमध्ये त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भेटले. ते तेव्हा त्याच भागात राहायचे. त्यांच्या संपर्कातून बाबूरावांच्या मनावर कामगार चळवळीचा प्रभाव पडला. मार्क्स, लेनिन आदी साम्यवादी विचारवंतांबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, गौतम बुद्ध यांचे विचार वाचनात येऊ लागले. ते सारे विचार, तो बेरोजगारी, विषमता यांविरुद्धचा राग बाबूरावांच्या कवितांमधून प्रकट होत होता.
१९५५ मध्ये रेल्वे वर्कशॉपमधील नोकरीनिमित्ताने बाबूराव सुरतेस गेले. प्रश्न राहण्याचा होता. जात आडवी येत होती. दलिताला घर भाड्याने दिले, तर लोकांचा धर्म बुडत होता, घर विटाळत होते. ही तेव्हाची सामाजिक परिस्थिती. बाबूरावांच्या मनात त्याबद्दलचा असंतोष होता; पण प्रश्न पोटाचा होता. नोकरी महत्त्वाची होती. त्यांनी आपली जात लपवून एका ठिकाणी भाड्याचे घर घेतले. पण हे त्यांच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हते. त्याचा मानसिक त्रास होऊ लागला त्यांना. अखेर नोकरी सोडून ते मुंबईला परतले; पण तो अनुभव त्यांच्या मनाला डागण्या देत होता. त्यावरची त्यांची ‘जेव्हा मी जात चोरली’ ही कथा आजही रसिकांच्या स्मरणात आहे. १९५७ मध्ये प्रथमच त्यांची कथा आचार्य अत्रेंच्या ‘नवयुग’ नियतकालिकातून प्रकाशित झाली. पुढील काळात ‘नवयुग’ व ‘युगांतर’ या नियतकालिकांतून त्यांच्या कथा एकामागोमाग एक प्रकाशित होऊ लागल्या. १९६३ मध्ये त्यांचा ‘जेव्हा मी जात चोरली’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. १९६९ मध्ये ‘मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. अघोरी, कोंडी, पावशा, सरदार, भूमिहीन, मूकनायक, अपूर्वा अशा कथा-कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला.
बाबुराव बागुल यांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची नवी लाट आली. त्यामुळे दलित साहित्याचा इतिहास त्यांच्या उल्लेखाशिवाय पुर्णच होऊ शकणार नाही. सर्जनशील साहित्यिक आणि विद्रोही साहित्य चळवळीचे प्रवर्तक बाबुराव बागूल यांनी २६ मार्च २००८ रोजी नाशिकमध्ये अखेरचा श्वास घेतला.
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)
महाराष्ट्र भूषण पु.ल. देशपांडे: महाराष्ट्रीय साहित्य-संस्कृतीतील हा एक अवलिया खेळिया