मुक्तपीठ टीम
शिवसेनेते नेते खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा लेख प्रकाशित केला आहे. त्यावर माध्यमांशी बोलताना तो लेख जाणीवपूर्वकच प्रकाशित केल्याचे त्यांनी सांगितले. त्यातून लोकांना कळेलच. त्यांनी पीएमसी बँक वगैरे खूपच. खूप काही बदनामीकारक लिहिलेलं असूनही प्रकाशित केले आहे, असं सांगतानाच पाटलांविरोधात कायदेशीर कारवाई सुरु करण्यास सांगितल्याचेही राऊत म्हणाले. मात्र, इतर लोकांप्रमाणे नाही तर फक्त सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
सामनात प्रकाशित झालेल्या चंद्रकांत पाटील यांच्या लेखात संजय राऊत यांच्यावर खोचक टीका आहे. त्यामुळे संजय राऊतांनी सव्वा रुपयाचा दावा करण्याची घोषणा केली आहे.
चंद्रकांत पाटलांच्या लेखात राऊतांना खुपणारं काय?
मुद्दा -१
ईडीचा अनुभव येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो!
तुम्ही अग्रलेखात लिहिले आहे की , ‘ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की , ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल . पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला ? संजयराव, तुमचा प्रश्न रास्त आहे . मला ईडीचा अनुभव नाही . तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो . आर्थिक गैरव्यवहार केले की , ईडीचा अनुभव येतो . तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता . अखेर बरीच धावपळ करून , ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात . हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार . असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला , पण मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच आहे .
मुद्दा – २
कोल्हापुरातील शिवसेनेच्या पराभवाचा तुम्हाला आनंद?
संजय राऊत तुम्ही अग्रलेखात एक षटकार ठोकला आहे त्याचा उल्लेख तर करायलाच हवा . हसन मुश्रीफांचे कौतुक करता करता तुम्ही म्हटले आहे , “ कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरूडला विजय मिळवावा लागला . ” कमाल आहे ! आमचे काय झाले आम्ही बघून घेऊ , पण कोल्हापूर जिह्यात शिवसेनेचाही पराभव झाला त्याचा तुम्हाला आनंद झाला की काय ? कालची विधानसभा निवडणूक कोल्हापूर जिह्यात भाजपा शिवसेनेबरोबर युती करून आणि जागावाटप करूनच लढली होती , हे विसरलात की काय ? या निवडणुकीत कोल्हापूर जिह्यात शिवसेना सहापैकी पाच जागांवर पराभूत झाली आणि एकच आमदार उरला , हे माहितीसाठी . सध्या तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली माहिती असते . पण शिवसेनेचा विसर पडला , असे वाटल्याने सांगितले . तुमचे हे असे वागणे आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचा उदो उदो करताना तुम्ही शिवसेनेलाही सुपडा साफ म्हणायला कमी करत नाही .
मुद्दा – ३
राष्ट्रवादी अडचणीत आल्यावर उसळता, तसे शिवसेनेसाठी नाही!
त्यामुळेच असेल कदाचित , राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री अडचणीत आल्यावर तुम्ही उसळलात आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून हल्ला केलात . पण अशी तत्परता तुम्ही शिवसेनेचे नेते अडचणीत आल्यावर दाखवत नाही . शरद पवारांवर कोणी टीका केली की त्यांचे प्रवक्ते असल्यासारखे तुम्ही अंगावर येता . त्यामुळेच तुम्हाला शिवसेनेत कोणी गांभीर्याने घेत नाहीत , असे दिसते . तुमच्या मध्यस्थीने आणि पुढाकाराने शिवसेनेने भाजपासोबतची विजयी युती तोडली आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्ता मिळवली . पण तुमच्या उद्योगामुळे शिवसेना किती अडचणीत आली याची तुम्हाला पर्वा नाही . उद्धवरावांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली , पण खरे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले . शिवसेनेच्या इतर बहुतांश नेत्यांना तर खुर्चीसुद्धा मिळाली नाही . या प्रकारात शिवसेनेचा मूळ मतदार नाराज झाला आणि काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस तर उभेही करत नाहीत . अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पक्षाला ‘ ना घर का ना घाट का ‘ , असे करून ठेवले . भाजपाचे नुकसान करणारया शिवसेनेची राजकीय पत तुम्ही संपवलीत . तुम्ही सातत्याने शरद पवारांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भजन करत असता त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही . तुम्ही पलटी मारली असेल तर तो तुमच्या पक्षप्रमुखांचा प्रश्न आहे .
मुद्दा – ४
सज्जनांच्या टीकेचा धोका, तुमच्यासारख्यांमुळे फायदाच!
असो . तरीही तुमचे आभार . कारण तुमच्यामुळे संघ परिवार संतापला आहे , भाजपाचा मतदार दुखावला आहे आणि शिवसेनेचा मतदार अस्वस्थ झाला आहे . त्यामुळे तुम्ही जेव्हा माझ्यावर टीका करता त्यावेळी या सर्व घटकांमध्ये माझ्याबद्दल चांगला मेसेज जातो . राजकारणात मित्र कोण आहेत या इतकेच शत्रू कोण आहेत हेसुद्धा महत्त्वाचे असते . किंबहुना ते अधिक महत्त्वाचे असते . राजकारणात ‘ निगेटिव्ह पब्लिसिटी’चाही उपयोग असतो . फक्त तशी टीका योग्य ठिकाणाहून व्हावी लागते . सज्जनांनी टीका केली तर धोका असतो . तुमच्यासारख्यांच्या टीकेचा फायदाच होतो . धन्यवाद .