मुक्तपीठ टीम
दैनिक सामना आणि कार्यकारी संपादक, शिवसेना नेते संजय राऊत आज एक अनपेक्षित धक्का दिला आहे. अर्थात त्याची सुरुवात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यांनी सामनाचे संपादकीय वाचून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ती प्रतिक्रिया लेख स्वरुपात दैनिक सामनाने प्रकाशित केली आहे. (तो लेख ‘मुक्तपीठ’वर संपूर्ण वेगळा प्रकाशित करण्यात आला आहे.) आजवर सामना वाचत नसल्याचे सांगणाऱ्या भाजपा नेतेही सामना वाचत असल्याचे त्यामुळे उघड झालं आहे, यावर संजय राऊत यांच्याकडून खोचक टिपणीही करण्यात आली आहे.
संजय राऊतांनी काय लिहिलंय?
चंद्रकांतदादा नियमित ‘ सामना ‘ वाचतात!
चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आहेत , असा सार्वत्रिक समज आहे ; परंतु भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हेच स्वतः आपण राष्ट्रीय अध्यक्ष आहोत की नाहीत याच्या वैचारिक गोंधळात आयुष्य कंठत असतात . तेथे चंद्रकांतदादांचे काय ? चंद्रकांतदादा नियमित ‘ सामना ‘ वाचत असल्यामुळे त्यांच्यामध्ये लेखी प्रतिक्रिया देण्याची खुमखुमी उत्पन्न झाली . हा एक ‘ सामना’चा चांगला ‘ साईड इफेक्ट ‘ आहे . आता मूळ ‘ इफेक्ट’कडे वळूया . पाटील यांनी ‘ तोंडास फेस , कोणाच्या ? ‘ या दि . २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखावर त्यांचे मन ढिले केले आहे . त्यांच्या प्रतिक्रियेत कानामात्रेचा बदल न करता जसेच्या तसे छापण्याची दिलदारी ‘ सामना ‘ दाखवीत आहे .
चंद्रकांत पाटलांचा राजकारणात उदय नक्की कोणत्या सालात झाला ? कसा व कोणामुळे झाला ?
एखाद्या नेत्याचे पाय जमिनीवर नसले व त्या नेत्यास वैफल्याने ग्रासले की गाडी कशी उताराला लागते याचा नमुना म्हणजे चंद्रकांत पाटील यांची ही प्रतिक्रिया . सार्वजनिक जीवनात टीकेचे घण सोसावे लागतात . पण टीका करणारे हे जणू आपले वैयक्तिक शत्रूच आहेत , असे चंद्रकांत पाटलांसारख्या नेत्यांना वाटते . चंद्रकांत पाटलांचा राजकारणात उदय नक्की कोणत्या सालात झाला ? कसा व कोणामुळे झाला ? हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे . तरीही आपल्यावरील टीकेला उत्तर देण्याचे त्यांचे स्वातंत्र्य मान्य करून चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध करीत आहोत .
“चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा”!
चंद्रकांतदादांनी ‘ सामना’च्या अग्रलेखावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया वाचून काय वाटेल याचे उत्तर श्रीमती रूपाली चाकणकर यांनी आधी दिले आहे . त्या म्हणतात , “ चंद्रकांतदादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेले एक गोड स्वप्न आहे . कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्या निखळ मनोरंजन होत आहे . सरकारने चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा . ”