मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राच्या ठाणे पोलीस आयुक्तालयात दीड हजार आरोपी फरार असल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी बरेचसे असे आहेत, ज्यांचा पोलीस १० ते १५ वर्षांपासून शोध घेत आहेत. यामध्ये कोट्यवधी रूपयांच्या ड्रग स्मगलिंग प्रकरणात फरार घोषित अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलर श्याम विजय गिरी उर्फ विकी गोस्वामी अशांचाही समावेश आहे. एकट्या ठाण्यात दीड हजार आरोपी फरार असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात किती आरोपी फरार असतील, असा सवालही पुढे आला आहे.
ठाणे अंमली पदार्थ विरोधी सेलने १२ एप्रिल २०१६ रोजी सोलापूर एव्हॉन लाईफ सायन्स कंपनीवर छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी २३ टन इफ्रेडीन औषध जप्त केले होते. कंपनी बेकायदेशीरपणे इफेड्रीन औषध परदेशात पाठवत असल्याचे उघड झाले. त्या रॅकेटचा विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णी यांच्याशी संबंध आढळले होते.
या प्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली आहे, तर विकी, ममता आणि डॉ अब्दुल्ला यांच्यासह एकूण ५ जण फरार आहेत. कळवा पोलीस हत्येप्रकरणी मिलिंद पाटील, राजेश चव्हाण, बाबुलाल जैस्वाल आणि सलीम सय्यद यांचा शोध घेत आहेत. १९९० मध्ये नितीन पाटील यांच्या हत्येतील आरोपी २०१७ मध्ये दिल्लीत लपल्याची माहिती मिळाली. जेव्हा पोलीस तेथे पोहोचले तेव्हा २०२१ मध्ये त्याच्या मृत्यूची बातमी समजली. मात्र, पोलिसांना या प्रकरणावर शंका आहे.
ठाण्यातील आरोपी फरार
- ठाणे शहर झोन ३२८ आरोपी फरार
- भिवंडी झोन २१५ आरोपी फरार
- कल्याण झोन ३४० आरोपी फरार
- उल्हासनगर ३६६ आरोपी फरार
- वागळे इस्टेट सर्कल २५० आरोपी फरार
- आयुक्तालय (इतर) १४९९ आरोपी फरार
- गेल्या एका वर्षात यातील जवळजवळ शंभर आरोपींना अटक