मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या फाईलवर कोणीतरी लाल शाईने बनावट शेरा लिहिल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता राजकारण सुरु झाले आहे. “ठाकरे सरकारमध्ये फाईल घोटाळा झाला असून मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्यावरील शेरा बदलण्यात आला. याबाबत विधानसभेत मागणी केल्यानंतर आता फौजदारी कारवाई सुरु झाली आहे” असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
काय आहे मंत्रालय फाइल बनावट शेरा प्रकरण? ही लिंक क्लिक करा आणि वाचा:
भाजपानेते आशिष शेलार यांनी सीएमओ कडे जाणाऱ्या प्रत्येक फाईलचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे. आणि महाविकासआघाडीच्या कार्यकाळातील या फाईल घोटाळ्याविरोधात लवकरात लवकर कारवाईची मागणी केली आहे. आशिष शेलार म्हणाले, “मी याआधीही फाईल घोटाळ्याबाबत आवाज उठवला होता. सरकारने सर्वच फाइलींचे ऑडिट केले पाहिजे. मात्र, सरकारचा याबाबत सुस्त दृष्टीकोन दिसून येत आहे.”
महाराष्ट्रात अजब युती होऊन अजब सरकार सत्तेत आले आणि या अजब सरकारच्या काळातील अजब घोटाळेही उघड होऊ लागलेत…ठाकरे सरकारमध्ये फाईल घोटाळा झाला असून मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्यावरील शेरा बदलण्यात आला. याबाबत विधानसभेत मागणी केल्यानंतर आता फौजदारी कारवाई सुरु झालेय.
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 24, 2021
“फाईल घोटाळ्यामागे काहींचा फायदा आहे. ते कोण आहेत हे आधी शोधून काढायला हवे. जर तशी कारवाई झाली नाही, तर घोटाळेबाज तसेच मोकाट राहतील. त्यांची आता मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीवर बनावट शेरा लिहिण्याची हिंमत झाली आहे, भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर ते आर्थिक घोटाळाही करू शकतील. त्यामुळे आताच कारवाई करावी,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयेश मिराणी यांनी केली आहे.
मरिन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये फाईल घोटाळ्यासंदर्भात ऑक्टोबर २०२० मध्ये एफआयआर नोंदवला गेला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडब्ल्यूडी अधीक्षक अभियंत्यांच्या विभागीय चौकशीच्या फाईलवर सही केली होती. या फाईलवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांची सही झाली. त्यानंतर लाल शाईने पवार नावाच्या अधिकाऱ्याला चौकशीतून वगळण्याचा शेरा लिहिण्यात आला. तो बनावट असल्याचे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शोधून काढले. त्यांनी ठाकरेंनी स्वाक्षर्या केलेल्या फाइल्सच्या स्कॅन प्रती शोधून काढल्या. आणि त्यात त्यांना आढळले की ही टिप्पणी मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर बदलण्यात आली आहे.
आता आशिष शेलारांच्या मागणीनंतर मंत्रालयातील फाइल घोटाळा प्रकरण गाजू लागणार एवढे निश्चित झाले आहे.