मुक्तपीठ टीम
अकोल्यात महाराष्ट्रातील खामगावमधून तेलंगणात काळ्या बाजारात विकण्यासाठी जाणारा गहू जप्त करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा रेशन माफियांचा हैदोस उघड झाला आहे. गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेणाऱ्या रेशन माफियांना काही राजकारणी आणि अधिकारी यांचा वरदहस्त असल्याशिवाय राज्यभर असे धान्य काळ्याबाजारात विकण्याचे गैरप्रकार घडणारच नाहीत, असा आरोप होत आहे. याआधीही अशा प्रकारे काळ्या बाजारात विकण्यासाठी नेले जाणारे गरिबांचे धान्य, अन्य वस्तू जप्त करण्याची कारवाई झाली आहे. पण दरवेळी कारवाई ही छोट्या माशांवर होत असल्याचा आरोप केला जातो. कारवाई एवढ्यांवर होत असेल तर पकडले न जाता बिनबोभाट काळाबाजार किती मोठ्या प्रमाणावर होत असेल, असाही प्रश्न विचारला जात आहे. मोठे रेशन माफिया तसेच मोकाट राहत असल्याने त्यांच्या कारवाया नव्याने सुरु राहतात, असे मानले जाते.
ताज्या घटनेत अकोल्यात गरिबांसाठी शासनाच्या सार्वजनिक धान्य वितरण यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या गव्हापैकी तब्बल ६०० क्विंटल गहू जप्त करण्यात आला आहे. हा गहू अकोल्याच्या खामगाव येथून हैदराबाद येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत होता.
राज्यभर रेशन माफियांचा हैदोस
- जानेवारी महिन्यात सांगलीतील विटा येथे विटा येथे काळया बाजारात जाणारी धान्याची ३०० पोती जप्त करण्यात आली.
- जून महिन्यात हिंगोली जिल्ह्यात अकोला-वाशिम रस्त्यावर स्थानिक गुन्हा शाखेनं जप्त केला होता. त्या कारवाईत ४६० पोती गहू आणि १२ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण १७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. याप्रकरणी ट्रकचालकासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- जुलै महिन्यात परभणीतील नवा मोंढा परिसरात दोन ट्रकसह ५०० पोती रेशनचा गहू जप्त करण्यात आला.
- ऑगस्ट महिन्यात अकोला जिल्ह्यातील हिवरखेडमध्ये ५२६ क्विंटल धान्य जप्त करण्यात आले. तेथील रमेश गुप्ताच्या गोदामात २५० क्विंटल रेशनचा गहू, २७६ क्विंटल रेशनचा तांदूळ, एक मोठा ट्रक, तीन मिनी ट्रक जप्त करण्यात आले.
- सप्टेंबर महिन्यात सोलापूर टेंभुणीमधील मोडलिंब मार्केट यार्डात काळ्या बाजारासाठी ट्रकमध्ये भरलेले आणि गोदामात लपवलेले रेशनचे साडे नऊ लाखाचा गहू आणि तांदूळ पोलिसांनी जप्त केला. आडत मालक सतीश माणिक सुर्वे, आणि ट्रक चालक, वाहकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.