मुक्तपीठ टीम
मुंबईच्या साकीनाका अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यू झाल्यानंतर संताप उफाळला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “साकीनाक्यात घडलेला प्रकार आणि त्यानंतर पीडितेचा मृत्यू मन सुन्न करणारा आहे. हे मुंबईच्या लौकिकाला साजेसे नाही. गेल्या महिन्याभराच्या काळात बलात्काराच्या घटना होत आहेत. त्या घटनांकडे राज्य सराकारने लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगतानाच जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवावे, असा सल्लाही त्यांनी दिला. त्याचबरोबर शक्ती कायदा, महिला आयोग नियुक्तीसाठी या सरकारला फुरसत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
सातत्याने अशा घटनांमुळे असुरक्षितता
- साकीनाका, अमरावती, पुण्यातील ३ घटना, पालघर, नागपूर या सगळ्या भयानक अशा घटना आहेत. मुंबईचा लौकिक सुरक्षित शहर म्हणून आहे.
- मुंबईत रात्री महिलांना फिरण्यात कधी अडचण येत नाही.
- पण अशा घटनांमुळे मुंबईच्या लौकिकाला धक्का पोहोचतो आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे.
- ही माणसं इतकी पाशवी कशी असू शकतात, असा प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटना आहेत.
जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी
- या प्रकरणात सर्व संबंधित आरोपींना अटक करावी, जलदगती न्यायालयामध्ये हे प्रकरण चालवावे.
- त्या माध्यमातून आरोपींना लवकर शिक्षा व्हायला हवी.
- अशा आरोपींना फाशीच व्हायला हवी.
सरकारला फुरसतच नाही..
- शक्ती कायद्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. पण काहीच झाले नाही.
- आजच्या कायद्यांचा वापर करूनही आपण जलदगती न्यायालयामध्ये अशा केसेस चालवू शकतो.
- या प्रकरणात स्वत: मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची भेट घेऊन जलदगती न्यायालयामध्ये हे प्रकरण नेऊन नराधमांना शिक्षा देण्याची विनंती करावी.
- महिला आयोगाच्या संदर्भात सरकारने अनेकदा आश्वासन दिलं, न्यायालयाने देखील आदेश दिले आहेत.
- पण सरकारला फुरसतच नाही की ते महिला आयोगाला अध्यक्ष देतील.