रवींद्र वर्पे
आज श्रावण अमावस्या म्हणजेच पेरणी अमावस्या किंवा बैलपोळा. आज पूजेसाठी बैल आणायला बाजारात गेलो. बैल घेतले आणि येताना एक शेतकरी म्हणून मागील २० वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यासमोर आला. गोष्ट अशी फार मोठी नाही, पण सध्याच्या राजकीय आणि बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. आपण त्या बैलांच्या विषयी, तसेच त्याचा मालक शेतकरी, जो एकेकाळी बळीराजा होता, त्यांच्यावर बोलूया. मी लहान असताना जून-जुलै पेरणीचा हंगाम सुरू व्हायचा. त्याकाळी खूप बागायती नसल्याने दूर पर्यंत शेतात ओत चालत असे.
जेव्हा पेरणी सुरू करणार असू त्यावेळी गावातील सुतार येऊन अवजारे ठोकून दुरुस्त करून देत असे. हलणारे रुमन पाखर टाकून देत. मग त्याला सूपभर गहू दिले जाते. थोड्या वेळाने गावातील नाभिक येत बैलांच्या शेपटी कापून गोंडे काढून देत. त्याला माप न लावता सूप भरून गहू दिला जात असे. थोड्यावेळाने चर्मकार येत असत. फडशी, चाबूकचे कातडी पाण लावून देत. त्याला सुपभर गहू देत. तसेच सर्व झाले की मग पेरणी होत असे.
नंतर धान्य खवल्यावर निघाले की बहुरूपी येत असे. पुढे सण पोळा, घटस्थापना, दिवाळी, अक्षयतृतीया कोणताही असो. गावचा कुंभार, बैल, मटके घट, पणत्या, चुली घेऊन येत त्यालाही सुप भरुन धान्य द्यावे लागते.
काळ बदलला बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली. बँकेने कर्ज दिले. ट्रॅक्टरला पण व्याज घेतलं. जे बैल घेत नव्हते. मॉल, मोठ्या कंपन्या आल्या. नवीन कृषी कायदे आले पिकांना भाव नाही. आम्ही रोज आत्महत्या करतोय. सरकार रोज आश्वासन देत आहे. वरील सर्व व्यथांना घेऊनच काल मुज्जफरनगरमध्ये शेतकरी तापला. राजकारण्यांनी जर लवकर काही उपाययोजना केल्या नाही तर पुढील काळात आम्हालाही सुपभर गहू मागावे लागतील.
वास्तविकता दर्शवणारा लेख