अश्विनी नांदेडकर
लोकशास्त्र सावित्रीचे हाऊस फुल प्रयोग झाल्यानंतर अचानक लॉकडाउन सुरू झाले. अशात मंजुल भारद्वाज सरांनी एक रंगकर्मी म्हणून सतत सृजन कसे करावे याची जाणीव करून दिली. सम्राट अशोक या नवीन नाटकाची तयारी त्यांनी सुरू केली आणि त्याचा एल्गार केला.
अभिनय या शब्दाची भुरळ पडते. अभिनय करणे म्हणजे आपल्या आत दुसऱ्या व्यक्तिमत्वाला प्रवेश देणे. मी अभिनयाची सुरवात केली त्यावेळी अभिनयाचा शाब्दिक अर्थ तर कळत होता. पण अभिनय का आणि कशासाठी करतात याची जाणीव नव्हती. “थिएटर ऑफ रेलेवन्स” या नाट्य सिद्धांताच्या प्रक्रियेत अभिनयाला एक दिशा, एक ध्येय आणि मार्ग मिळाला. “गर्भ” नाटकामध्ये अभिनयाची जाज्वल्य इच्छाशक्ती प्रस्तुत झाली. अभिनय कसा असावा आणि अभिनयाने मिळणारे आत्मिक समाधान कळाले. मग पुढच्या प्रत्येक नाटकात एक वेगळा संघर्ष, एक वेगळी पातळी गाठत अभिनयाचे एव्हरेस्ट शिखर गाठले. फक्त चरित्रच नाही तर विचार प्रस्तुत करायला लागलो. स्त्री-पुरुष यात न अडकता माणूस म्हणून नाटकात अभिनय करत होतो. जसे महात्मा गांधी, भगत सिंग व बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका आम्ही महिला असून प्रस्तुत करत होतो, ही पुरुषाची भूमिका आहे यात अडकलो नाही, उलट आम्ही त्यांना विचार म्हणून प्रस्तुत केले.
प्रत्येक नाटकाच्या प्रक्रियेत मराठी, हिंदी रंगभूमीची मापदंड तोडत नव्या क्षितिजांना गाठायला सुरवात झाली. कपडे, संगीत, नेपथ्य, lights या पलीकडे जाऊन नाटकाच्या संकल्पनेची ताकद प्रस्तुत केली. अभिनयाच्या समग्र आयमांना समजण्यास सुरवात केली. जसे लिखाण – वाचन, शोध, चर्चा, संवाद या समग्रतेने अभिनय आणि नाटकाच्या समग्र आयमांना पाहायला लागलो. माझा अभिनय केवळ माझे समाधान नाही तर समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे माध्यम बनले आहे.
अशाच एका पायरीवर सरांनी सम्राट अशोक या नाटकाची सूत्रं उलगडली. नाटकाची तालीम सुरू करतांना वाचन, पाठांतर, चरित्र समजणे, दिग्दर्शन, सराव या पायऱ्या प्रत्येक कलाकार अनुभवतो. नाटकात माझी भूमिका आणि मी स्वतः यातला प्रवास साधत असतो. सम्राट अशोक या नाटकाच्या या प्रवास साधनेत मीही होते. मंजुल सरांनी या नाटकाची तयारी सुरू केली. आम्हांला परफॉर्मन्स विडिओ पाठवून अचंबित केले. स्क्रिप्ट वाचनाची सुरवातच अनोख्या पद्धतीने सुरू झाली. ऑनलाइन वाचन. मोबाईल स्क्रीनच्या या बाजूला आम्ही तर पलीकडे सर. लॉकडाउन मुळे प्रत्यक्षात भेटता येत नसले तरी नाटकाची प्रक्रिया बाधित होत नव्हती. नाटकातील माझे चरित्र म्हणजेच छायावाणीचा सूर कसा पकडायचा याची तालीम सुरू झाली. प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर एक सूर निर्माण करते. त्या सुराने त्या शब्दाचा स्वर प्रतिध्वनी म्हणून प्रेक्षकांत उमटतो आणि प्रतिसाद बनून आपल्यासमोर येतो. त्या प्रत्येक शब्दाचा सूर एक कलाकार म्हणून शोधणे आवश्यक होते. ‘मैं’ या एका शब्दातील स्वर, व्यंजन,अनुस्वार या प्रत्येकाला सरांनी जाणवून दिले. महत्वाकांक्षा या शब्दात नेमके कोणत्या अक्षरावर जोर दिला तर कसा अर्थ पोहोचतो, याची जाणीव करून दिली. ‘कल्याण’ हा शब्द बोलतांना ती समृद्धी डोळ्यासमोर तरळते का? साम्राज्य या शब्दाची फोड साम आणि राज्य अशी करून दोन वेगळे शब्द एकत्र बोलतानाही दोन्ही शब्दांचा उच्चार स्पष्ट कसा येईल. ‘कलिंग’ हा शब्द त्याची ह्रस्व मात्रा पण अनुस्वार चा दीर्घ सूर कसा निघणार? अशा बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष वेधत वाचन सुरू झाले. वाचतांना आम्ही प्रत्येक शब्द हा धावत वाचत होतो. त्याच्या मागे अद्भुत प्रक्रिया आहे. शब्द ध्वनी असतात. ध्वनी श्वासाने उत्पन्न होतो. प्राण म्हणजे हवा आपल्या शरीराच्या सर्व ध्वनी यंत्रातून प्रवाहित होते. ज्यावेळी आपण पळायला सुरवात करतो त्यावेळी प्राकृतिक रूपाने आपल्या पोटातून ऊर्जा फुफ्फुसांमध्ये येते आणि हा प्राणवायू आपल्या शक्तीचा स्रोत बनतो. पळण्यामुळे हीच प्राणशक्ती आपल्या नाभी पासून सुरू होऊन मस्तिष्का पर्यंत संचार करते. या अभ्यासामुळे आपला श्वासतंत्र आणि ध्वनियंत्र दोन्ही उघडते. आपल्या व्यक्तिगत बोलण्याच्या मर्यादांना हा अभ्यास उघडतो. आपण नाटकात जे चरित्र प्रस्तुत करू इच्छितो त्याचे संवाद शब्द या अभ्यासाने आपल्या ध्वनी तंत्रात तरंगीत होऊ लागतात, बसू लागतात. “अनहद नाद” या नाटकात शेवटच्या दृश्यात आम्ही केवळ श्वासाच्या आधाराने बोलतो. तो उच्च कोटीचा स्वर ज्यामुळे प्रेक्षक एका ब्रम्हांडिय ऊर्जेत जातात आणि कलाकार म्हणून मूर्त दिसणाऱ्या शरीरांपलिकडे एक अमूर्त वलय मी अनुभवायला लागते. या नाटकातील ह्या सुरांनी नाटकाचा शेवट होतो आणि सम्राट अशोक ची सुरवात याच सुराने करायची होती. सौम्य पण प्रखर सूर समजायला सुरवात झाली. सरांसोबत रंगमंचावर परफॉर्म करणार या विचारानेच भारी वाटत होते. ज्यांनी आतापर्यंत मला रंगमंचावर उभं केले, घडवले. आज त्यांच्या बरोबर रंगमंचावर उभं राहणे मनाला अभिमानास्पद वाटत होते. २ जुलै ला कार्यशाळेत सरांचा प्रत्यक्षात पहिला प्रयोग पाहिला, अनुभवला. हा पहिलाच प्रयोग म्हणजे तालीम आम्ही जिथे करत होतो ती जागा युसुफमेहेर अली यांच्या नावाने ओळखली जाते . त्याच दिवशी त्यांची पुण्यतिथी होती. आमच्या नाटकाच्या तालमीद्वारे आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यशाळेत आल्या आल्या सरांनी परफॉर्म करत आमच्यातल्या कलाकारांना आवाहन केले होते. कलाकाराची तयारी आणि उंची ही माझ्यातल्या अभिनेत्रीला आरसा दाखवणारी होती. सरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कामातून ते कमालीचे प्रेरित करतात. त्यांची प्रत्येक कृती अंतर्मनाला जाऊन भिडते आणि आपण कधी करणार याचा भाव , विचार स्पष्ट होत जातो. या भूमिकेसाठी लागणारी शरीरयष्टी यावरही सरांनी काम करायला सुरुवात केली होती. त्यांचा रोजचा चेतनामय व्यायाम त्यांच्या भूमिकेला उंचीवर नेत होता. कलाकार आणि त्याची तयारी … “थिएटर ऑफ रेलेवन्स” कार्यशाळा म्हणजे कलाकाराची प्रयोगशाळा. दरवेळी नाटकाची तालीम या कार्यशाळेत आम्ही करत आलो आहोत. सम्राट अशोक या नाटकाची तालीम या कार्यशाळेत होणार होती. पण एक कलाकार म्हणून माझी तयारी किती हवी याची जाणीव नव्हती. मंजुल सर पहिल्यांदा आमच्यासोबत कलाकार म्हणून नाटकात, रंगमंचावर उभे राहणार आहेत. त्यांची भूमिका आणि कलाकार म्हणून तयारी पाहून मला जाणीव झाली की या प्रयोगशाळेत येतांना स्वतःला तासून , अभ्यास करून आलो तर वेगळ्या उंचीवर जाण्याची संधी निर्माण होते आणि तयारी नाही केली तर बेसिक गोष्टींमध्ये कार्यशाळेचा वेळ निघून जातो. असे ऐतिहासिक नाटक मी पहिल्यांदा परफॉर्म करणार होते. असे चरित्र जे कधी पाहिले नाही किंवा जास्त ऐकलेही नाही अशा चरित्राला आजच्या परिस्थितीशी साधर्म्य, संदर्भ शोधत जोडायचे होते. सुरवातीला सरांसोबत परफॉर्म करायचे या विचारांनीच थरकाप उडाला होता. त्यांची एक कलाकार म्हणून रंगमंचावर स्पंदीत होणारी प्रचंड ऊर्जा आधीच्या नाटकांच्या तालमीत थोडीफार अनुभवली होती. पण आता पूर्ण नाटक परफॉर्म करायचे होते. थरकाप यासाठीच की त्यांच्या पातळीपर्यंत, त्यांच्या उर्जेपर्यंत मी पोहोचू शकेन की नाही? पण गेली १० वर्ष मनात स्वप्न बाळगले होते की एकदा तरी सरांसोबत परफॉर्म करायचे आहे. या स्वप्नांनेच खरी ताकद दिली. २ जुलै ला पाहिलेल्या पहिल्या परफॉर्मन्स मध्ये मला केवळ सरांचे डोळे दिसले जे अजूनही माझ्या लक्षात आहेत. ती तीव्रता अजूनही जाणवते. त्यांच्या प्रत्येक वाक्याचा tone माझ्या लक्षात राहिला. कलिंग! कलिंग! कलिंग! अशी गर्जना करत सम्राट अशोक नाटकातील ‘अशोक’ हे चरित्र माझ्यासमोर अवतरीत होत होते. रंगचिंतक मंजुल भारद्वाज सर हे चरित्र धारण करत रंगमंचावर प्रवेश करतात त्यावेळी सम्राट अशोकाचा सत्ता आणि अहंकाराचा हुंकार गुंजतो. या प्रयोगाच्या तालमीमध्ये पहिल्या दिवसापासून आतापर्यंत या चरित्राचा उंचावणारा आलेख आणि अभिनयाच्या अनेक मापदंडांना मोडीत काढून नव्या आयमांना सृजित करण्याचा मी अनुभव घेतला. आतापर्यंत वेगवेगळ्या नाटकात पाहत आलेल्या विविध कलाकारांच्या चारित्रांच्या कैक पलीकडे हे चरित्र मला घेऊन जाते. सम्राट अशोक हे चरित्र पाहत असतांना मंजुल सरांचे तीक्ष्ण डोळे, स्पंदीत होणारी स्पंदनं, शरीराच्या, हाताच्या, पायांच्या शार्प हालचालीतून प्रत्यक्षात उभा राहणारा सम्राट अशोक माझ्यातल्या अभिनेत्रीला खडबडून जागा करणारा होता.
मला कलाकाराचा संघर्ष दिसत होता पण मला सम्राट अशोकचा संघर्ष पाहायचा आहे असे मी म्हणाले आणि तिथून माझ्यातल्या कलाकाराचा संघर्ष सुरू झाला. कारण केवळ एक प्रेक्षक म्हणून मला नाटक पहायचे नव्हते तर एक कलाकार म्हणून त्यातल्या बारिक बारीक गोष्टींना नजरेत आणायचे होते. मूर्त स्वरूपात सादर होत असलेल्या नाटकामधील अमूर्तला पकडायचे होते आणि ते अमूर्त पाहण्यासाठी त्या परफॉर्मन्स चे व्हिडीओ सातत्याने आम्ही पाहत होतो. एक कलाकार म्हणून माझा समजण्याचा आवाका वाढवणे म्हणजे नेमके काय? सरांचा परफॉर्मन्स आम्ही पाहत होतो. त्या परफॉर्मन्स चा विडिओचाही अभ्यास करत होतो. पण प्रत्येकवेळी जेवढे मला समजतंय त्यावरच बोलत होते. पण व्हिडीओ ला पाहतांना नवीन शोध घेत नव्हतो.जेवढे आवडतंय तेच दिसत होतं. आतापर्यंत अनुभवत आलेली तालीम आणि अभिनयाचे शिकवलेले मुद्दे प्रकर्षाने दिसत होते. पण तिथेच थांबायचे नव्हते. कलाकार म्हणजे नव्याचा शोध. जेवढे नजरेला दिसतं तेवढेच नाही तर त्या मूर्त असणाऱ्या पलीकडे अमूर्तला पकडणे म्हणजे कलाकार. व्हिडीओ मध्ये किंवा प्रत्यक्ष परफॉर्मन्स बघून केवळ एक प्रेक्षक म्हणून मी पाहते की कलाकार म्हणून याची जाणीव होत होती. सम्राट अशोक चे चरित्र हे larger than life असे आहे.सर परफॉर्म करतांना आपण तसेच पाहतो आहोत का? सर सांगत असलेले larger than life चे चरित्र काही केल्या पल्ले पडत नव्हते. सर explain करत होते की अशोकचे हात छतापर्यंत टेकलेले दिसतात आणि माझ्या लक्षात येत नव्हते की सर असे का बोलतात. त्या मागचा संदर्भ समजत नव्हता. मग सर म्हणाले की चेतनात्मक illusion कुठे आहे? सरांनी चेतनात्मक कल्पना शक्ती illusion या शब्दाची ओळख करून दिली. या शब्दाने माझ्यातल्या कलाकाराला एक नव दृष्टी मिळाली. एक कलाकार म्हणून कलाकृती पाहतांना माझी कल्पनाशक्ती जी माझ्या चेतनेला जागवत असते ती कुठे आहे ? की केवळ सामान्य प्रेक्षक होऊन मी छान छान असे शब्द बोलून माझी जबाबदारी टाळतेय? अभिनय हा कल्पनाशक्तीवर उभा असतो. कलाकार कल्पना करतो मग वस्तू असो परिस्थिती असो किंवा चरित्र असो. आणि त्याची कल्पना भरारी घेते त्यातून सृजन साकार होते. एक कलाकार म्हणून मी सम्राट अशोकला त्याच्या प्रत्येक हालचालीत, संवादात प्रस्फुटीत होणाऱ्या अमूर्तला शोधायला सुरवात केली.
अमूर्त शोधणे सहज सोप्प नाही. अमूर्त शोधण्यासाठी त्या तरंगांना आपल्यात उतरवणे गरजेचे आहे. सिद्धांताचे ध्येय नाटकाचे ध्येय आणि माझे व्यक्तिगत ध्येय यांना एकत्रित करून निर्माण होणारे तरंग मला माझ्याशी जोडतात. मला नाटक भावले की नाही या मुद्द्यावर भावलं तर का आणि नाही भावलं तर का? यावर तर्कशुद्ध मांडणी करणे आवश्यक आहे याची जाणीव सरांनी करून दिली. खरं सांगायचं तर या तर्कशुद्ध शास्रार्थ करण्यात आमचे वादच जास्त झाले. पण या संवादातून संहितेच्या अधिकाधिक जवळ जात होतो.
सरांच्या परफॉर्मन्स मधून प्रश्नही पडत होते. जे दिगदर्शकाच्या दृष्टीने होते. स्टेज चे design काय? चरित्र रंगमंचावर कोणत्या स्थानावर उभा आहे? आणि तिथेच का उभा आहे? एका चरित्राची रंगमंचावर असणारी movement ही त्याच्या संवादात त्याच्या ध्येयात अंतर्भूत असते ती ओळखणे गरजेचे आहे. नाटकाचा संवाद लेखक लिहितो पण त्या शब्दांना कलाकार केवळ मशीन सारखं बोलत नाही तर आपल्या दृष्टीने विचाराने त्याला अर्थ प्राप्त करून देतो. लेखक लिहितो दिग्दर्शक दिग्दर्शन करतो. कलाकाराची नाभी नाळ रंगमंचाशी जोडलेली असते तिच्या स्पर्शाचे नाते कधी विसरू नये. कलासत्व म्हणजे कलेच्या स्पर्शाचे तत्व.
सम्राट अशोक हे नाटक का करत आहोत हा प्रश्न मनाला पडत होता. ते नाटक बघतांना वाचतांना अशोक चा अहंकार आणि त्याचे परावर्तित रूप आताच्या राजनैतिक परिस्थितीकडून असलेल्या अपेक्षेशी साधर्म्य साधतांना मला जाणवले. आपला भारत संविधानावर उभा आहे. संविधानाची मूलभूत तत्व सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता याचे मूळ सम्राट अशोक च्या प्रशासन नीती मध्ये मिळते. आजही आपल्या भारताची ओळख सम्राट अशोक च्या अशोक स्तंभाने होते. या सम्राटाची ही परिवर्तनाची गाथा प्रत्येकाला ज्ञात व्हावी. परिवर्तन नेहमी प्रेरणा देते.
थिएटर ऑफ रेलेवन्सची चैतन्य अभ्यास प्रक्रिया ही व्यक्तीच्या चार आयमांना जागृत करते. शारीरिक, भावनिक, मानसिक आणि आत्मिक. हीच जागृत अवस्था पूर्ण दिवस आमच्या सृजन प्रक्रियेत ताकद देत असते. पण मी एक कलाकार आणि व्यक्ती म्हणून या चैतन्यअभ्यास च्या प्रक्रियेला माझ्यामध्ये किती जिवंत ठेवते याची जाणीव सरांनी करून दिली.
नाटकासाठी काय costume असावे यावरही चर्चा सूरु झाली. एक ऐतिहासिक नाटक, चरित्र कशा प्रकारे दिसेल याची चर्चा सुरू झाली. मुळात अशोक कसा दिसेल कसा असेल यापेक्षा त्याचा विचार परिधान करणे अधिक आवश्यक होते. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यसिद्धांत अनुसार प्रस्तुत होणारी नाटकं ही थिएटर, lights, costume, music नेपथ्य यांच्या पलीकडे जाऊन कलाकारांच्या अभिनयाने आणि विचाराने अभिभूत करते.
सुरवातीला ज्यावेळी सर आम्हांला परफॉर्मन्स चे विडिओ पाठवत होते आणि ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा आमच्यासमोर नाटक परफॉर्म केले होते त्यावेळी सरांना परफॉर्म करत पाहतांना मला माझ्या गर्भ नाटकाची प्रक्रिया प्रकर्षाने जाणवत होती. गर्भ नाटक बघतांना मी प्रेक्षकांना कशी जाणवत असेल, कशी दिसत असेल याची पदोपदी जाणीव होत होती. कलाकाराचे ते passion, आवाज, संघर्ष या सगळ्यांची मला उजळणी होत होती. माझ्यामध्ये सरांनी त्यांची छबी कशा प्रकारे तंतोतंत उतरवली आहे याची जाणीव होत होती. अभिनयातील गर्भ हे गाठलेले शिखर त्याची प्रक्रिया नव्याने कळत होती. पण जस जसे सम्राट अशोक ची तालीम पुढे गेली तस तसं गर्भ नाटक प्रक्रिया detached झाली. हळूहळू मी त्या प्रक्रियेतून बाहेर येऊन सम्राट अशोकला नव्याने पाहायला सुरवात केली. ज्यावेळी सरांनी माणुसकीसाठी संघर्ष करणाऱ्या चेतनेची आणि अशोक च्या तालमीची नवीन प्रकिया स्थापित केली. गर्भ परफॉर्म केल्यानंतर मी कोणत्या विश्वात जाते हे सम्राट अशोक नाटकाच्या तालमीत शोधायचे होते आणि तो शोध म्हणजे की गर्भ परफॉर्म करतांना मी माझ्या चेतनाशक्ती ने घडवलेल्या विश्वात जाते याची जाणीव झाली. विषयाचा धागा लेखकाच्या हातात असतो पण कल्पनाशक्तीचा धागा कलाकाराच्या हातात असतो. तो धागा पकडून मी ते शब्द रंगभूमीवर जगून परत येते आणि प्रत्येकवेळी माझ्या हिशोबाने जगते.
दोन कार्यशाळांच्या दरम्यान मी facebook live केले. सरांनी तालमीला थेट प्रेक्षकांसमोर आणले होते. मी तालीम मधील मजा, नवीन शिकवण प्रेक्षकांशी थेट share करण्यासाठी याची सुरवात केली. आतापर्यंत कलाकार नाटकाची फायनल प्रस्तुती प्रेक्षकांना दाखवतो पण थिएटर ऑफ रेलेवन्स या प्रक्रियेत सरांनी नाटक उभं राहण्याच्या प्रक्रिये पासूनच प्रेक्षकांना सहभागी केले. ही रंगमंचावरील अद्भुत प्रक्रिया सरांनी initiate केली.
दुसऱ्या phase मध्ये कार्यशाळेत पोहचल्यावर सरांनी विचारले. मी एकटा परफॉर्म करू की तुम्ही ही परफॉर्म करणार. आणि माझ्या मनात विचार आला की आता नाही तर कधी नाही. आता सरांसोबत उभी नाही राहिले तर दडपण कायम राहील. जे व्हायचं आहे ते होईल पण मी कलाकार म्हणून उभी राहणार. प्रयोग झाला आणि मनावरचे दडपण उतरले. आपण करू शकतो ही भावना दृढ झाली.
छायावाणी हे चरित्र निभावतांना सरांनी हे चरित्र हळू हळू उलगडायला सुरवात केली. छायावाणी हे चरित्र खुद्द सम्राट अशोक चे मन आहे. जसे मंजुल सर आहेत त्यांची उत्प्रेरक पद्धत, रागावणे, गुरुभाव, प्रहार करणे, प्रेम करणे, आकार देणे, समजावणे हे सगळे भाव त्या छायावाणी चरित्रात आहे. आमच्या अनहद नाद नाटकातील शेवटचा सुराने सम्राट अशोक नाटकातील छायावाणी च्या सुराची सुरवात होते. प्रत्येक चरित्राची आवाजाची पट्टी वेगळी असणार होती. सम्राट अशोक केवळ एक व्यक्ती नाही तर स्टेट्समन शिप म्हणून त्याच्याकडे पाहणे गरजेचे होते. माझ्यातल्या अभिनेत्रीला नव्याने रंगमंचावर उभं राहण्याची सुरवात करायची होती. आतापर्यंत सर करून घेतील ही भावना होती. पण वाचन करतांना मला चरित्राचा सूर पकडता येत नव्हता. चरित्राचा भाव कळत होता. छायावाणी हे चरित्र अशोक चे मन आहे हे कळत होते. पण अशोक २३२१ वर्षांपूर्वीचा चक्रवर्ती सम्राट होता ज्याने जगाला स्वतःमध्ये परिवर्तन करून एक मोठे उदाहरण प्रस्थापित केले होते. त्या अशोक चा आवाका व्याप्ती समजल्याशिवाय छायावाणी चे चरित्र हातात येणारच नव्हते. म्हणून अशोक ला समजुन घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. सरांचा विडिओ तील आवाज हा मला एका काळाचा आवाज वाटला. त्यांच्या अभिनयात ती grace, तो काळ, realization दिसत होते . हे सगळे छायावाणीमध्ये उतरवायचे होते. सरांचा आवाज ऐकणे आणि तो समजणे यातील प्रवास म्हणजे सृजन आहे. थिएटर ऑफ रेलेवन्स प्रक्रियेनुसार प्रत्येक नाटकातील संवादाचा संदर्भ शोधणे सुरू झाले. मी या नाटकाला आताच्या राजकीय परिस्थितीशी जोडत होते. आता हे नाटक यातील संवाद कुठे तारतम्य जोडत आहेत याचा शोध घेत होते. सर ज्यावेळी प्रत्येक संवादाचा विडिओ करून पाठवत होते त्यावेळी या प्रक्रियेने ते लेखकाला पदोपदी विश्वास देत होते. लेखकाला align करत होते, चरित्राला ते कसे होल्ड करत आहेत हे समजत होते. नाटक लिहितांना लेखक केवळ लेखकाच्या भूमिकेत नसावा तर तो कलाकार , दिग्दर्शक, प्रेक्षक ते चरित्र आणि नाटकाचे प्रस्तुतिकरण या सगळ्या आयमांना त्याने बघून नाटक लिहिणे आवश्यक आहे.
कलाकार म्हणून सम्राट अशोक च्या तालमीत सर्वात पहिले उभं राहतांना गाळण उडालेली. मी पहिल्यांदा सरांसोबत रंगमंचावर उभी राहिले त्यावेळी सर म्हणाले की कलाकार म्हणून हा रंगमंचाचा स्पर्श मला काय सांगतो. तो आनंद देतो का की मी रंगमंचावर उभी आहे त्याची कलाकार म्हणून मी नेहमी वाट पाहते. रंगभूमी आपल्याशी काय संवाद करते , तिचा स्पर्श आपल्याला काय सांगतो ही प्रक्रिया सरांनी केली आणि त्या ताकदीने पहिली एन्ट्री मी घेतली. प्रत्येक वेळी रंगमंचाचा स्पर्श आणि माझा स्पर्श मी अनुभवते त्यावेळी माझ्यातला कलाकार mechnize होत नाही. मी अशोकच्या चेतनेची भूमिका करत होते. चेतना जी स्पंदीत असते, तरंगीत असते. अशावेळी माझी देहबोली मात्र जड वाटत होती. देहबोलीतून ती तरंगणारी स्पंदने जाणवत नव्हती. सुरवातीला संवाद पाठ असूनही मी स्क्रिप्ट हातात घेऊन उभी होती. कारण स्वतः वरती तो विश्वास नव्हता. सरांनी एकदा विचारले की अजूनही तुझी स्क्रिप्ट पाठ नाही. त्यावेळी ठरवले की तालमीला आता स्क्रिप्ट हातात घेणार नाही. कोणतेही काम करतांना माझ्या मनात माझे संवाद फिरत होते. सम्राट अशोक या नाटकात अभिनेत्री म्हणून नवीन आयमांना उलगडले. सर्वात पहिले तर माझे संवाद बोलतांना काव्यात्मक सूर लागत होता तो ब्रेक केला. ज्यावेळी माझा काव्यात्मक सूर लागत होता त्यावेळी थांबून सरांनी अपेक्षित सूर छेडला. नाटकातल्या प्रत्येक संवादाला rhythm असतो. प्रत्येक संवादात असलेले ध्येय सरांनी माझ्यासमोर मांडले आणि छायावाणीचे चरित्र त्याचे ध्येय याची मांडणी नजरेसमोर आली. अभिनयासाठी त्या चरित्राचे ध्येय, स्वभाव, मानसिकता, भाषा या सगळ्यांवर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यानुसारच त्याची जडणघडण समोर येते. शरीराच्या प्रत्येक हालचाली अश्विनी नाही तर छायावाणी करते हे लक्षात येणे गरजेचे आहे . केवळ सुचनात्मक नाही तर रंगमंचावर ते चरित्र जगणे महत्वाचे आहे. जसे माझ्यासमोर मंजुल सर अशोक हे चरित्र जगत होते. तालमीला उभं राहण्याआधी मी एक अभिनेत्री म्हणून माझी तयारी करून उभी राहणे गरजेचे आहे मग दिग्दर्शक भलेही नंतर उलथापालथ करो.
या नाटकाची तालीम ही कधीच रटाळ नव्हती. जसं सारखी सारखी तालीम करून कलाकार mechanize होऊन जातो. तशी तालीम ना करता आपले चैतन्य जागवून केलेली ही तालीम होती. प्रत्येक वेळी सर एक नवीन दृष्टी घेऊन तालीम करत होते. अध्यात्म अध्य आत्म म्हणजेच आत्म अध्ययन .. माणसाने माणूस म्हणून कसं जगावं हे सांगणारे अध्ययन. सम्राट अशोक आणि अध्यात्म याचा थेट संबंध जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. स्व अध्ययन करणारी व्यक्ती अध्यात्माच्या शिखरावर असते. याचे अनेक उदाहरण आपल्या इतिहासात आहे. थिएटर ऑफ रेलेवन्स मध्ये प्रत्येक नाटक एक संकल्पना घेऊन येते. तत्व आणि ध्येयावर उभे असते. ते तत्व कलाकार मोठया विश्वासाने आणि प्रतिबद्धतेने प्रेक्षकांसमोर मांडतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे ती तत्व व्यक्ती म्हणून आपल्या जीवनात उतरवण्याची सुरवात करतो. सम्राट अशोक हे नाटक समग्र व्यक्तीत्व, statemenship ला घेऊन येते. स्व- अध्ययनाने परिवर्तनाची हुंकार भरते.
स्व-अध्ययनात व्यक्ती स्वतःमध्ये स्वतःला, परिवाराला, समाजाला, देशाला, विश्वाला आणि ब्रम्हांडाला सामावून घेतो. या प्रत्येक आयमाच्या प्रश्नांची उकल स्वतः करायला लागतो. स्वतः उकल करणे याचा अर्थ केवळ त्याच्या पातळीवर विचार करतो असे नाही. तर या पातळीला व्यक्ती स्वतःला निसर्गाशी एकरूप करतो. निसर्ग म्हणजे पंचतत्वांनी बनलेली एक अद्भुत आणि अनाकलनीय रचना. व्यक्ती या अकल्पनिय रचनेचे सर्वांग सुंदर साध्य. पंचतत्वांनी बनलेल्या या निसर्ग वा प्रकृतीला आपल्या आत स्थान देण्यासाठी पंचतत्वानेच बनलेली ही व्यक्ती आपल्या पंचेद्रियांच्या माध्यमाला आवाहन करते. नाटकातील सम्राट अशोक हे चरित्र केवळ या पंचेंद्रियांनाच नाही तर अमूर्त असणाऱ्या आपल्या सहाव्या इंद्रियाला ज्याला आपण आत्मा, जाणीव, मन या शब्दात मांडतो या माध्यमातून जगासमोर अद्भुत परिवर्तनाचा प्रवास मांडते.
सम्राट अशोक हे चरित्र ज्यावेळी या पंचतत्वाच्या माध्यमातून मी पाहते त्यावेळी निसर्गाने निर्मित झालेल्या नीतीनुसार त्याच्या जडणघडणीचा प्रवास समोर येतो. जसे की निसर्ग हा सर्वसमावेशी, परिवर्तनवादी आणि सृजनशील आहे. सम्राट अशोक स्वतःशी संघर्ष करत पंचमहाभुतांच्या तत्वांना आपल्यात उतरवतो. अहंकाराच्या अग्नीत स्वतःला तापवतांना कलिंग युद्धाने झालेल्या जखमांच्या जाणिवेने त्याच्या मनात माणुसकीची संवेदना जागृत होते.
आपल्या अहं ला सोडून स्वत:ची ज्योत पेटवून विश्वाला पाहतो. अहिंसेच्या ठोस मातीवर उभं राहून पाण्यासारखं निर्मळ आणि सर्व समावेशक आकाशाचे स्वरूप धारण करत सम्राट अशोक युगांयुगे आपल्या समोर अशोक स्तंभ म्हणजे आपल्या देशाची ओळख म्हणून उभा राहतो.
सम्राट अशोकला अध्यात्म स्व अध्ययनाशी जोडणे तसेच पंचतत्व आणि मानवीय पंचेंद्रियांशी साधर्म्य जोडणे. यामुळे मला सम्राट अशोक नाटकाच्या मुळाला धरता आले. स्व अध्ययन ते अध्यात्म या अमूर्तला अभिनयच्या स्वरूपात मूर्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जशी सरांनी पंचतत्वाच्या प्रक्रियेला आणले त्यावेळी या नाटकाशी वैचारिक नाते जोडले गेले. अभिनयात सर्वात महत्वाचे आहे की वैचारिक रित्या आपण जोडले जाणे. त्याशिवाय रंगमंचावर उभं राहणे शक्य नाही. सुरवातीला सरांसोबत परफॉर्म करण्याच्या विचाराने आलेले दडपणा ची जागा विश्वासाने घेतली. एक सहकलाकार म्हणून सरांनी दिलेल्या ऊर्जेचा अनुभव येत होता. त्यांच्या डोळ्यातूनच छायावाणीच्या चरित्राला लागणारी ताकद ऊर्जा मिळत होती. केवळ डोळ्यातून सहकलाकाराला नाटकाच्या ध्येयापर्यंत पोहोचवणे आणि चरित्राचा आलेख उंचावणे काय असते ते मी अनुभवले. पहिले दडपण नंतर सहकलाकार असा प्रवास मी केला. भाव मुद्रा मध्ये सर्वात महत्वाचे की माझे बोलणे सौम्य पण देहबोली स्ट्रॉंग करायची होती. छायावाणी हे चरित्र समजवणारे, प्रसंगी रागावणारे, गुरुभाव, प्रेम अशा आयमांनी सजलेले होते अशी दृष्टी मिळाल्यावर छायावाणीच्या चरित्राची grace आणि व्याप्ती समजत होती.
नाटक हातात येणं म्हणजे नेमके काय? सरांनी आदल्या दिवशी आम्हांला सांगितले की चला नाटक हातात देतो. रंगमंचावर आम्ही आलो, सरांनी स्वतःभोवती फेऱ्या मारायला सांगितल्या . त्या स्वतःभोवती उलटी आणि सुलटी फेरी मारतांना जणू पूर्ण नाटक माझ्यासोबत आलं. पूर्ण नाटक माझ्या नजरेसमोर आलं. रंगमंचाशी मी जोडले गेले. त्या स्पर्शाने प्रफुल्लित झालो. माझे प्रत्येक शब्द आणि माझे शरीर यात एकरूपता आली.
१२ ऑगस्ट २०२१ रोजी थिएटर ऑफ रेलेवन्स या नाट्यसिद्धांताला २९ वर्ष पूर्ण झाली. आपल्या तत्वांवर ठाम राहत जगाला सुंदर आणि मानवीय बनवण्याच्या प्रतिबद्धतेची ही २९ वर्षं. या निमित्ताने सम्राट अशोक या नाटकाची प्रस्तुती आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्सच्या रंगकर्मींनी सादर केली.
सद्यकाळाशी साधर्म्य आणि संदर्भ शोधत या नाटकाची प्रस्तुती मी अनुभवली. संविधानाच्या मूलभूत तत्वांचे मूळ सम्राट अशोकच्या शासननीती मध्ये मिळते. १२ ऑगस्ट ची प्रस्तुती माझ्यासाठी अविस्मरणीय प्रस्तुती ठरली आहे. मंजुल भारद्वाज यांनी त्यांच्या अभिनयाने मला त्या काळात नेले. अशोकचा स्वतःशी स्वतःच्या मनाशी झालेला संघर्ष त्यांनी प्रभावीपणाने मांडला. तालीमच्या सुरवातीला मंजुल सरांसोबत रंगमंचावर उभं राहण्यात माझी गाळण उडाली होती. पण जसं जसं सरांनी थिएटर ऑफ रेलेवन्सचे ध्येय, नाटकाचे ध्येय आणि प्रत्येकाचे व्यक्तिगत ध्येय यांना समन्वयीत करून तालमीला स्पंदीत केले. मला मंजुल सर एका सहकलाकाराप्रमाणे जाणवले.
आतापर्यंत कलाकारांनी फ्रंट expose केले नव्हते जे सरांनी आपल्या performnace मध्ये केले आहे. सम्राट अशोक नाटकाला अध्यात्म, पंचतत्व, पंचेंद्रियांच्या दृष्टीतून अनुभवतांना माझ्या नाटकातील चारित्र्याच्या चेतनेने माझ्यातल्या कलाकाराची उंची वाढली आणि कलाकार म्हणून दृढ विश्वास निर्माण झाला. एक कलाकार म्हणून या नाटकाच्या प्रस्तुतीने मला प्रचंड ताकद दिली. कलाकार म्हणून स्वामित्व दिले. प्रस्तुतीला सुरवात झाली त्यावेळी माझे लक्ष कधी प्रेक्षकांकडे तर कधी सरांकडे जात होते. सरांचे संवाद माझ्या कानापर्यंत पोहोचत नव्हते. पण जसे माझे लक्ष सरांच्या परफॉर्मन्स कडे गेले त्यावेळी मला आतून एक आवाज येत होता की रंगमंचावर हे माझेच शरीर परफॉर्म करतंय आणि केवळ मीच रंगमंचावर आहे. मी आहे जी जगाला शांतीचा मार्ग दाखवणार. मी आहे जी एका अहंकाराने मदमस्त विकाराला विवेकाचा, अहिंसेचा मार्ग दाखवणार. छायावाणी हे चरित्र माझ्यात संचारत होते. आणि प्रस्तुती नंतर मला स्वामित्व भाव जागृत झाला. स्वामित्व म्हणजे माझं अस्तित्व , व्यक्तिमत्व आणि चेतना यांची जाणीव होणं.
प्रयोग प्रस्तुत करतांना माझे शरीर अशोक पण मी आत्मा त्यामुळे माझ्या एक व्यक्ती म्हणून उमटणाऱ्या भावना काबूत ठेवायच्या होत्या. अशोक त्याच्या कर्मामुळे ढासळतो पण मी त्याची चेतना असल्याने मी प्रखर ठाम उभी असणे आवश्यक होते. पण सरांच्या डोळ्यातील अश्रू पाहून माझे डोळे पाझरत होते त्यावेळी माझे मन मला बजावत होते की मी तटस्थ आहे. तटस्थपणे या भूमिकेला पाहणे गरजेचे आहे. प्रस्तुती झाल्यानंतर माझ्या मुद्रांचा मी विचार करत होते . अशोक चे परावर्तित रूप माझ्यासमोर येत होते. हे परिवर्तन छायावाणीच्या प्रेरणेतून घडते. त्यामुळे मी या चेतनेच्या मुद्रा अशोकच्या परावर्तित रूपातून शोधल्या. त्या मुद्रांमध्ये आताच्या परिस्थितीशी साधर्म्य जोडले. माझ्या हाताने आरसा दाखवण्याची मुद्रा सरांनी अधोरेखित केली. म्हणजेच प्रत्येक मुद्रेमध्ये मूर्त अमूर्त शोधायला सुरवात केली या प्रक्रियेने प्रत्येक मुद्रा आणि संवादाला एक gravity मिळाली.
धनंजयकुमार यांच्या लेखणीतून साकार झालेल्या या नाटकाचे शब्द रंगभूमीच्या मातीत एकरूप होतात आणि तिथून मंजुल भारद्वाज यांच्या अभिनयाने अंकुरित होत अवकाशात झेप घेतात.
या नाटकाचे प्रथम मंचन युसुफमेहेरली सेंटर, तारा, पनवेल येथे झाले. आपला देश निर्माण प्रक्रियेत असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची गाथा रचली. युसुफमेहेरली ज्यांनी ‘भारत छोडो’ हा नारा आपल्याला दिला. त्या तमाम क्रांतिकारकांना त्यांच्या भूमीवर आम्ही ‘सम्राट अशोक’ नाटकाची प्रस्तुती त्यांना सुमनपुष्प म्हणून वाहिली. या संकट काळातही शासनाचे सर्व निर्बंध पाळून ४५ ते ५० प्रेक्षक सम्राट अशोकच्या परिवर्तनाचे साक्षीदार बनले. आपल्या विकारांवर विवेकाने केलेली मात याची जाणीव जगले.
(अश्विनी नांदेडकर या रंगभूमीच्या सेवेला वाहून घेतलेल्या अभिनेत्री आहेत.)