मुक्तपीठ टीम
एकीकडे भाजपासोबत युती तोडून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी सरकार बनवून सत्तेत आले. मात्र तरीही दुसरीकडे चित्र मात्र वेगळेचं दिसतं आहे. शिवसेनेतील अनेक जुने नेते नाराज असून आघाडीतील शिवसेनेच्या मित्र पक्षांमध्ये जात आहेत. मराठी माणसांच्या हिताचा मूळ उद्देश असणाऱ्या शिवसेनेवर हिंदी भाषिकांचा कब्जा होत असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेनेचे नागपूरमधील माजी उपमहापौर व माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबंधे यांनी शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे विदर्भातील आधीच कमकुवत असलेल्या शिवसेनेला धक्का बसल्याचे मानले जाते.
गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील अनेक जुन्या शिवसैनिकांनी पक्षांतर केले आहे. त्यात नागपूर मनपाची निवडणूक तोंडावर असताना सावरबांधे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षात खळबळ माजली आहे. नागपुरातील शिवसेनेत असलेल्या असंतोषाची कारणं मुंबईहून मागवल्याची माहिती मिळत आहे. तर शिवसेनेच्या एका माजी पदाधिकाऱ्याला तातडीने मुंबईत बोलावणं आल्याचीही माहिती आहे.
शिवसेनेत दोन दशके घालवलेल्या शेखर सावरबांधेंना शिवसेना का झाली नकोशी?
- शेखर सावरबांधे हे नागपूरचे माजी उपमहापौर आहेत.
- शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे विश्वासू मानले जातात.
- विदर्भातल्या शिवसेनेवर त्यांची मजबूत पकड होती.
- शिवसेना सोडताना त्यांनी व्यक्त केलेली व्यथा महत्वाची मानली जाते.
- परंतु “आपले नेते खा. गजानन कीर्तिकर यांच्या शब्दाला निर्णय प्रक्रियेत स्थान नाही, मग आपण सेनेत राहून काय करायचं?
- शिवसेनेत बाहेरुन आलेल्यांना संधी दिली जात आहे, पण जुन्या शिवसैनिकांना डावललं जातंय.
- मी जवळपास २० वर्षे शिवसेनेत राहिलो.
- पण आता पक्षाचं चित्र पाहता सेनेत राहणं शक्य नाही.
सेना नेतृत्वाचे विदर्भाकडे दुर्लक्ष, शिवसेनेला दुसरा धक्का!
- शिवसेना पक्षनेतृत्वाकडून विदर्भाकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, असा स्थानिक शिवसैनिकांचा नेहमीच आरोप असतो.
- गेल्या महिन्यात अशोक शिंदे यांनी शिवसेनासोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.
- आता शेखर सावरबांधे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
- विदर्भात तसाही शिवसेनेचा फारसा प्रभाव नाही, अशातच सावरबांधे यांच्या शिवबंधन तोडून राष्ट्रवादी प्रवेशाने ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का बसल्याचे मानले जाते.
- आता शिवसेना नेतृत्वाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना पाचरण करून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.