मुक्तपीठ टीम
लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. लोकलमध्ये अत्यावश्यक सेवांशी जोडलेल्या लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई लोकलमध्ये प्रवाशांचा आकडा १७ लाखांवर पोहचला आहे. दोन महिन्यांपूर्वी महिलांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ही गर्दी महिला प्रवाशांमुळे होत असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी पुन्हा एकदा रेल्वेने बनावट ओळखपत्र तयार करणाऱ्या लोकांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. याआधीही अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत.
सर्वप्रथम आरपीएफकडून आरोपीचा फोन नंबर आणि टेलिग्राम संदेशाबाबत प्राथमिक माहिती पुरविली होती. आरोपी टेलिग्रामद्वारे लोकांशी संपर्क साधायचा आणि लोकलमध्ये प्रवास करण्यास इच्छुक असलेल्या लोकांना बनावट ओळखपत्र तयार करुन द्यायचा. या आरोपी विरोधात बनावट ओळखपत्र तयार केल्याबद्दल वसई रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ११ जानेवारी २०२१ रोजी वैभव रूपेश शाह या २१ वर्षीय आरोपीला अटक केली. त्याच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६५ आणि ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सुचनेनुसार अत्यावश्यक सेवांतील कर्मचारी आणि महिला प्रवाश्यांसाठी निर्धारित कालावधीत रेल्वेच्या १,२०१ विशेष उपनगरी लोकल सेवा कार्यरत आहेत. कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता, पश्चिम रेल्वेद्वारे सातत्याने सुचना देण्यात येत आहे की, महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेल्या अत्यावश्यक सेवेतील लोकांना आणि इतर प्रवर्गातील लोकांनाच या विशेष उपनगरी सेवांमध्ये प्रवास करण्याची परवानगी आहे.
लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांना बनावट ओळखपत्र उपलब्ध करुन देण्याऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आरपीएफने मोठी भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र शासनाने ठरवलेल्या निकषांचे पालन करण्यासाठी पश्चिम रेल्वेला सहकार्य करावे आणि कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर मार्गदर्शक सूचनांचे देखील पालन करावे अशी विनंती पश्चिम रेल्वेने जनतेला केली आहे.