मुक्तपीठ टीम
ऑगस्ट संपत आला. इतर सरकारी कर्मचाऱ्यांना त्या पगाराचे वेध लागले असताना एसटी कर्मचाऱ्यांचे जुलैचे वेतन रखडले आहे. त्यामुळे मान्यता प्राप्त एसटी कर्मचारी संघटनेने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. औद्योगिक न्यायालयाने ३ सप्टेंबरपर्यंत सर्व एसटी कामगारांचे वेतन देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, धुळे जिल्ह्यातील साक्री आगारातील एसटी कर्मचारी कमलेश बेडसे ही बातमी ऐकायला थांबले नाहीत. त्यांनी तुटपुंजा वेळेवर न मिळणारा पगार, कर्जाचा डोंगर यामुळे शुक्रवा्री स्वत:ला संपवले, अशी बातमी टीव्ही माध्यमांमध्ये आल्याने एसटी कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत.
औद्योगिक न्यायालयाची तंबी, ३ सप्टेंबरपूर्वी वेतन द्याच द्या!
- एसटी कामगारांचे वेतन गेली काही वर्षे सतत वेळेवर होत नाही.
- अनेक महिने ते रखडून ठेवले जाते.
- त्यासाठी एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण दिले जाते.
- मात्र, कोरोना संकटातही कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून मुंबईसारख्या शहरातही राबवले गेले.
- एसटी कर्मचाऱ्यांना दर महीन्याच्या सात तारखेपर्यंत वेतन देण्याचे प्रशासनाने मागे मान्यही केले.
- तरीही मागील काही महिन्यांपासून कामगारांना वेळेवर मिळत नाही.
- १९३६च्या वेतन प्रदान अधिनियमानुसार किमान १० तारखेपर्यंत मासिक वेतन देण्याची तरतूद आहे.
- तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने २३ ऑगस्टला मुंबईच्या औद्योगिक न्यायालयात कामगार संघटनेच्या वतीने दावा दखल करण्यात आला होता.
- औद्योगिक न्यायालयाने एसटी महामंडळाला ३ सप्टेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे आदेश दिले आहेत.
एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
- धुळे जिल्ह्यातील साक्री येथे एसटी महामंडळात कमलेश बेडसे काही वर्षांपासून काम करत आहेत.
- अतिशय तुटपुंजा पगार आणि तोही वेळेवर मिळत नसल्यामुळे बेडसे काही दिवसांपासून मानसिक तणावातून जात होते.
- तसेच त्यांच्यावर कर्जदेखील वाढल्याने ते नैराश्यात गेले होते.
- शेवटी तुटपुंज्या पगारामुळे घरातील आर्थिक स्थिती खालावत गेल्यामुळे त्यांनी शुक्रवारी आत्महत्या केली, अशी बातमी टीव्ही माध्यमांमध्ये आली आहे.
- न्यायालयाचा पगार देण्याचा निर्णय ऐकण्याचीही त्यांनी वाट पाहिली नाही.
- यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.