शंकर रामचंद्र गायकवाड, हणमंत दिनकर गायकवाड / व्हा अभिव्यक्त
शेटफळेमधील शेतकरी शंकर रामचंद्र गायकवाड, हणमंत दिनकर गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुक्तपीठकडे व्यथा पोहचवली. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी कोरड्या रखरखाटातून सरकारला साद घालणारं व्हिडीओ निवेदन मुक्तपीठच्या विनंतीवरून पाठवले. त्यात त्यांनी जे सांगितले ते त्यांच्याच शब्दात:
सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा तसा नेहमीच पाण्याची वाणवा असणाराच आमचा तालुका. तरीही आम्ही शेतकरी अस्मानी अवकृपेशी झुंजत शेती पिकवतो. राबराब राबतो, घामाचं पाणी घालतो. आणि शेतात पिकाचे मोती पिकवतो. पण आता गेल्या दोन तीन दिवसांपासून आमच्या शेटफळे गावात शेतीचा पुरवठा कापण्यात आला आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांची मेहनत करपून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आमचं शेटफळे गावं तसं खूप प्रसिद्ध महान कविवर्य ग. दि. माडगुळकरांमुळे जगविख्यात झालेलं. आजही त्यांचं नाव घेतलं की आमच्या गावचा उल्लेख होतोच होतो. त्यांनी या गावात शब्दांचे मोती पिकवले. गावाचं नाव मोठं केलं. मोठं मोठी लोक तेव्हा गावात येत. आता मात्र दुर्लक्ष झालंय. गावावर, गावकऱ्यांवर साऱ्यांवरच दुर्लक्षातून अन्याय होतोय.
दोन तीन दिवस झालं पंपाची लाइट बंद केलेली आहे. शासनाने काही तरी दखल घेतली पाहिजे. शेतकऱ्यांचे फक्त मरण आहे. डाळिंब बागा, जनावरं, माणसं सगळ्यांना पाणी लागतं. पाण्याविना माणसं जनावरं तडफडायला लागली.हातातोंडाशी आलेलं घास निघून चाललाय. अगोदरच हा दुष्काळी भाग. शासन दुष्काळ जाहीर करत नाही. पण आहे तेसुद्धा माणसाला पदरात पडू देईना. यासाठीच लाइट चालू करावी, शासनाला विनंती आहे.
दोन तीन दिवस झालं लाइट नाही. लाइट नसल्यानं पिण्याचा पाण्याचा सुद्धा प्रश्न झालाय. विहिरीतील पाणी काढता येत नाही. पायऱ्या नाय काय नाय त्या. महावितरणला शासनाने विनंती करावी की लाइट चालू करावी.
शेतकऱ्यांनी मुक्तपीठला पाठवलेलं व्हिडीओ निवेदन नक्की पाहा:
(ज्यांनी आपलं गाऱ्हाणं मांडलं ते शेतकरी आहेत. त्यांनी पाठवलेल्या व्हिडीओ निवेदन आणि तुळशीदास भोईटेंनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या माहितीवर वरील माहिती दिलेली आहे)