मुक्तपीठ टीम
भारतीय समाजात दान, पुण्य व सेवा कार्याला फार महत्व आहे. सेवा परमो धर्म: असे आपल्या देशात मानले जाते. या सेवाभावामुळे कोरोना काळात तसेच अतिवृष्टीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत शासकीय, अशासकीय संस्थांसह सामान्य नागरिकांनी विलक्षण कार्य केले. प्रत्येकाने अशीच अधिकाधिक निःस्वार्थ सेवा करून मातृभूमीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.
कोरोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० कोरोना योद्ध्यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जय फाऊंडेशन व रुद्र प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्याला आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, महाराणा प्रताप महासंघाचे अध्यक्ष अमरसिंह ठाकूर तसेच जय फाऊंडेशनचे संस्थापक धनंजय सिंह सिसोदिया प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते नवाझ मोदी सिंघानिया, शायना एनसी, डॉक्टर्स, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, समाजसेवक तसेच इतर करोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला.