मुक्तपीठ टीम
बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक कर्तृत्ववान लोकांचे बायोपिक बनवण्यात आले आहेत. यातून त्यांच्या जीवनसंघर्षाची कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू या दोन्ही ऑलिम्पिकवीरांचं जीवन प्रेरणादायी. कुणालाही बायोपिकचा मोह व्हावा असेच. सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी नुकतीच टोकियो ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांची भेट घेतली. खरंतर भांडारकर यांनी त्यांना भेटल्याची माहिती पोस्ट केली, पण लगेच चर्चा रंगली ती या दोघांच्या प्रेरणादायी जीवनावरील बायोपिकची. अद्याप भांडारकर यांनी तशी घोषणा केलेली नाही.
- नीरज चोप्राने ८७.५८ मीटर थ्रोसह भालाफेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.
- वेटलिफ्टर मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले.
- मधुर भांडारकर यांनी या दोघांशी संवाद साधला आणि ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.
- दिल्लीत त्यांच्या भेटीबद्दल बोलताना मधुर भांडारकर म्हणाले, “नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू या दोघांना भेटून मला आनंद झाला. ते खरे हिरो आहेत. ज्यांनी आपल्या देशाला अभिमान दिला आहे.”
मधुर भांडारकर यांनी नीरज आणि मीराबाई यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांना भेटून खूप आनंद झाला आणि टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतासाठी सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. चॅम्पियन्स.”
भांडारकर यांनी बायोपिकनिर्मितीविषयी इतर काहीही घोषणा केली नसली तरी त्यांच्यासारख्या संवेदनशील, सर्जनशील चित्रपट दिग्दर्शकाने या दोन ऑलिम्पिकवीरांच्या जीवनावर चरित्रपट बनवले तर देशाच्या युवापिढीला मोठी प्रेरणा मिळेल, एवढं नक्की!