मुक्तपीठ टीम
शेतकरी आपल्या गाई-गुरांवर पोटच्या लेकरांएवढंच प्रेम करतो. जास्तच जीव लावतो म्हटलं तरी चालेल. त्यामुळेच अनेकदा गाय गरोदर राहिली की तिचं लेकीसारखंच डोहाळ जेवणंही हौसेनं केलं जातं. आताची चांगली बातमी कोल्हापूर जवळील सांगवडेवाडीत झालेल्या गाईच्या डोहाळे जेवणाची आहे.
कोल्हापुरातील करवीर तालुक्यात सांगवडेवाडी गाव आहे. तिथं राहणाऱ्या श्रीकांत गणमाळी यांची गाय लाडाची. ती गरोदर राहिल्यापासूनच त्यांनी तिच्या डोहाळेजेवणाचे नक्की केलं होतं. आता कोरोनाचा प्रकोप कमी होताच संधी मिळाली आणि त्यांनी एखाद्या लेकीसारखंच गाईचं डोहाळे जेवण आयोजित केलं.
सुरेखा श्रीकांत गंधमाळे आणि श्रीकांत गणमाळी यांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम अति उत्साहाने पार पाडला. शेजारील सुहासिनी बायकांना बोलावून हळदी कुंकू ओटी भरुन गाईला साडी तिच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालून सर्व रीती रिवाजा प्रमाणे पूर्ण केले.
कसा असतो गाईच्या डोहाळ जेवणाचा सोहळा?
- घरात लेकीच्या डोहाळजेवणासारखेच गोडधोड पदार्थ केले जातात.
- गावातल्या आया-बाया डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी घरी जमतात.
- डोहाळ कार्यक्रमाची वेळ झाली की गाईला मंडपात बांधण्यात येतं.
- लाऊडस्पीकरवर गाणी लावण्यात येतात.
- एकएक करत २१ महिला गाईची ओटी भरत तिला ओवाळतात.
- त्यानंतर पाच प्रकारची फळे गाईला खाऊ घालण्यात येतात.
- गाईमुळे शेतीत प्रगती होते, गाईच्या दूधातूनही आर्थिक बाजूही सावरली जाते, त्यामुळे ती घरासाठी गोलक्ष्मी असते.
- शेतकरी स्वतःच्या लेकीप्रमाणेच कुटुंब जिव्हाळ्याने पशुधनाचा सांभाळ करतात.
- गाईच्या डोहाळ जेवणाचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आप्तस्वकिय हजेरी लावत जेवणाचा आस्वाद घेतात..