मुक्तपीठ टीम
अध्यक्षाविना कामकाज सुरु असलेल्या काँग्रेस पक्षाला आजतरी अध्यक्ष मिळणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेले अनेक दिवस काँग्रेस नवे अध्यक्ष कोण असतील, यापेक्षाही कधी अध्यक्ष मिळणार, यावरच चर्चेचा भर राहिला आहे. आज काँग्रेसच्या कार्य समितीची म्हणजेच सीडब्ल्यूसीची बैठक आहे. या बैठकीत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरही चर्चेची शक्यता आहे.
गेल्या वर्षी काँग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षात संघटनात्मक बदल आणि नेतृत्वाबाबत पत्र लिहिले होते. हे पत्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या पुढाकाराने लिहिले गेले होते. पत्रावर सही करणाऱ्यांमध्ये कपिल सिब्बल आणि आनंद शर्मा या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. त्या पत्रानंतर काँग्रेसमध्ये खळबळ माजली होती. त्यानंतर त्वरित कार्यसमितीची बैठक बोलावली गेली. नाराज नेत्यांना शांत करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली.
अनेकांच्या मते अखेर राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारू शकतात. प्रियंका गांधींसाठी अनेकांचा आग्रह असला तरी त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या काही जमीन प्रकरणांमुळे त्यांना लक्ष्य करणे, अडचणीत आणणे भाजपला सोपे जाणार असल्याने त्यांचे नाव मागे पडत राहिले आहे. तर काहींच्या मते राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होण्यास नकार दिल्यास अशोक गहलोत यांना काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. कारण अशोक गहलोत हे गांधी कुटुंबियांच्या खूप जवळचे आणि विश्वासू असल्याने अशी शक्यता वर्तवली जात आहे.