मुक्तपीठ टीम
महिलांमध्ये कोरोना विरोधी लसीकरणाच्या आकडेवारीचा अभाव असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. या बातम्यांची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की लसीकरणातील लिंगभेद कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्या. लसीकरणाच्या सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत २७ कोटी ८६ लाख ४० हजार ०४३ पुरुष तर स्त्रीयांमध्ये २४ कोटी ७५ लाख ०३ हजार ६२५ महिलांना लस मिळाली आहे.
देशभरात जाहीर करण्यात आलेल्या कोरोना लसीकरणाअंतर्गत महिला आणि पुरुषांना दिल्या गेलेल्या डोसमधील फरकाचा उल्लेख करून महिला आयोगाने आपल्या पत्रात लिहिले आहे की लसीकरण मोहिमेत महिला मागे राहणार नाहीत याची खात्री बाळगण्यात यावी.
@NCWIndia has written to Chief Secretaries of all States/UTs on gender gap in vaccination coverage. Chairperson @sharmarekha has asked for measures to close the gender gap in vaccination & to ensure women are not left behind in the vaccination drive.@PIBWCD @PIB_India @PBNS_India pic.twitter.com/LU9zGTQY0y
— NCW (@NCWIndia) August 13, 2021
लसीकरणामधील फरक चिंताजनक!
- ‘लसीकरणात पुरुष आणि स्त्रियांमधील फरक हा चिंतेचा विषय आहे,’ असे महिला आयोगाने स्पष्ट केले.
- यासाठी राष्ट्रीय अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून त्यांना हे अंतर संपवण्यास सांगितले आहे, जेणेकरून महिला लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत.
- आयोगाने पत्रात असेही लिहिले आहे की, अशी अनेक कुटुंबे आहेत जिथे स्त्रियां घराबाहेर पडत नाहीत, म्हणुन त्यांच्या आरोग्यास पुरुषांच्या आरोग्यापेक्षा कमी प्राधान्य दिले जाते.
- परंतु घरातल्या प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या महिलांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते आणि म्हणूनच त्यांना लसीचा डोस देणे महत्वाचे आहे.
लसीकरणातील भेदभाव
- सरकारी आकडेवारीनुसार, २७ कोटी ८६ लाख ४० हजार ०४३ पुरुष, २४ कोटी ७५ लाख ०३ हजार ६२५ महिला यांना लस देण्यात आली आहे.
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल्या नुसार आतापर्यंत देशव्यापी कोरोना लसीकरणाखाली कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ५२,९५,८२,९५६ डोस देण्यात आले आहेत, त्यापैकी ५७,३१,५७४ डोस गेल्या २४ तासांमध्ये देण्यात आले आहेत.
- केंद्राने आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीचे ५५.०१ कोटीहून अधिक डोस प्रदान केले आहेत.
- राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या २.८२ कोटींपेक्षा जास्त लस डोस उपलब्ध आहेत.