मुक्तपीठ टीम
राज्य सरकारने टास्क फोर्ससोबत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. शालेय शिक्षण विभागाने १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता शाळा सुरु करण्यासाठी सरकारच्या नव्या आदेशाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातल्या पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला होता. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार आता, टास्क फोर्सच्या सूचनांनंतर शाळांबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.
काय म्हणाल्यात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड?
- गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य सांभाळण्यासाठी निर्णय घेत आलो आहोत.
- टास्क फोर्सच्या बैठकीनंतर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
- टास्क फोर्स काय म्हणालं, या संदर्भातली माहिती घेणार आहे.
काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?
- शाळा आणि कॉलेज सुरु करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासन निर्णय घेतील.
- टास्क फोर्स आणि पिडियाट्रिक टास्क फोर्सने शाळा-कॉलेज सुरु करण्यास विरोध दर्शवला आहे.
- याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्स आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संध्याकाळी बैठक घेतील.
- या बैठकीत शाळा-कॉलेजबाबत अंतिम निर्णय होईल.
- शाळांबाबतचा निर्णय आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत जाहीर होईल.
टास्क फोर्सने व्यक्त केली भीती
- दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालेलं नाही.
- इतर राज्यात असे प्रसंग घडलेले आहेत.
- रिस्क घेऊ नये.
- याबाबतची बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल.