मुक्तपीठ टीम
पेगॅसस हेरगिरीबद्दल संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. संरक्षण मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, पेगॅसस स्पायवेअरची विक्री करणाऱ्या एनएसओ या इस्रायली कंपनीशी त्यांचा काहीएक संबंध नाही. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेत सांगितले की, मंत्रालयाचा एनएसओ ग्रुप टेक्नॉलॉजीजशी कोणताही व्यवहार झालेला नाही. याआधी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लावण्यात आलेले आरोप भारतीय लोकशाहीच्या प्रतिमेला हानी पोहचवण्याच्या उद्देशाने असल्याचा आरोप केला होता.
पेगॅससचा वाद वाढताच…
- पेगॅसस मोबाइल हेरगिरीच्या मुद्द्यावरून विरोधक संसदेच्या दोन्ही सभागृहात आवाज उठवत आहेत.
- भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नेहमीप्रमाणे स्वत:च्या सरकारलाही अडचणीत आणणारे मुद्दे मांडले होते.
- पेगॅसस स्पायवेअर ही एक व्यावसायिक कंपनी आहे, जी पेड कॉन्ट्रॅक्टवर काम करते.
- त्यामुळे या ऑपरेशनसाठी पैसे कोणी दिले? जर भारत सरकार नाही तर कोण? असे प्रश्न उपस्थित होतात, हा त्यांचा प्रश्न सरकारलाही अडचणीत आणणारा होता.
- भारतातील लोकांना सत्याची जाणीव करून देणे हे मोदी सरकारचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी सरकारला बजावले होते.
- काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले होते.
एनएसओ पेगॅसस स्पायवेअरबद्दल काय सांगते?
- कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, एनएसओ ग्रुप सरकारी एजन्सीजसाठी स्थानिक आणि जागतिक धोक्यांची विस्तृत श्रेणी शोधण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी उत्तम दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करतो.
- एनएसओची उत्पादने सरकारी गुप्तचर आणि कायदा-अंमलबजावणी संस्थांना दहशतवाद आणि गुन्हे रोखण्यासाठी आणि तपासासाठी एनक्रिप्शनची आव्हाने पेलण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मदत करतात.