मुक्तपीठ टीम
राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून हाकला जातो, ते कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत असते. सुरक्षा एवढी की तेथे सामान्यांना त्यांच्या कामासाठी प्रवेश मिळत नाही. मिळालंच तर त्यासाठी अनंत उठाठेवी कराव्या लागतात. एकप्रकारे सामान्यांना अनेकदा प्रवेशबंदीच असते. अगदी पत्रकारांनाही सहजासहजी जाता येत नाही. पण त्याच मंत्रालयात दारुच्या बाटल्यांना फ्री एंट्री असल्याचे दिसत आहे. आघाडी सरकारने प्राधान्याने चंद्रपूर जिल्हा दारुबंदी मुक्त केला तसेच बहुधा कुणीतरी मंत्रालयही दारुबंदीमुक्त झाल्याचे मानले असावे.
मंत्रालयातून आलेली एक बातमी धक्कादायक बातमी आहे. मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. मंत्रालयात नेहमीच चोख पोलीस बंदोबस्त, सर्वसामान्यांची तपासणी आणि सुरक्षा व्यवस्था तैनात असते. पण असं असताना त्या कडेकोट बंदोबस्तातच दारुच्या बाटल्यांचा खच सापडला आहे. मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या आल्या कशा ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मंत्रालयात बाटल्या आल्याच कशा?
मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमुर्तीच्या मागील बाजूस दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
मंत्रालयात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असताना व तपसाणी होत असताना एवढ्या दारूच्या बाटल्या आल्या कशा?
या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि हे कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पण या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
यावेळी दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की “ही अत्यंत गंभीर बाब असू याप्रकरणाची योग्य ती चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल.” मंत्रालयाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ही पोलीस प्रशासनाकडेच असते. पण मंत्रालय म्हणजे, सर्व मंत्री, सर्व विभागांचा विषय येतो. हा केवळ गृहमंत्री किंवा पोलिसांचा विषय नाही.”