मुक्तपीठ टीम
कोरोना संसर्ग संकटात सर्वांना हवीहवीशी वाटतेय ती कोरोना प्रतिबंधक लस. मात्र, पुरेशा पुरवठ्याअभावी याच लसीपासून देशातील कोट्यवधी आजही वंचित आहेत. सरकारवरीवल लसपुरवठ्याचा भार कमी करण्यासाठी अनेक संस्था, नेते आपापल्या कुवतीनुसार लसीकरणाचा भार उचलत आहेत. ताजं उदाहरण कल्याणचे आमदार गणपत गायकवाडांचं. त्यांच्या पैशातून नागरिकांच्या मोफत लसीकरणाला आजपासून सुरूवात झाली आहे.
आपल्या मुलाच्या लग्नाचा खर्च टाळत नागरिकांचं कोरोना लसीकरण करण्याचा संकल्प मे महिन्यात केला होता. त्यानुसार या लसीकरणाला कल्याणमध्ये सुरूवात झाली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आमदार गायकवाड यांनी मुलाचे लग्न साधेपणाने करण्याचं ठरवलं. या लग्नावरील खर्च नागरिकांच्या कोरोना लसीकरण मोहिमेसाठी वापरण्याचा निर्णय गायकवाडांनी घेतला होता. त्यानुसार आता लसीकरण सुरु झाले आणि गायकवाडांचा लग्न संकल्प पूर्ण झाला.
दोन हजार नागरिकांना दिली जाणार मोफत लस
- आ. गणपत गायकवाड यांची लसीकरण मोहीम तीन दिवस चालणार आहे.
- कल्याण परिसरातील दोन हजार नागरिकांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे.
- या मोफत लसीकरणासाठी रिक्षा चालक, घरेलू कामगार, लॉण्ड्रीचालक यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
- लसीकरण मोहीमेच्या शुभारंभाला आ. गणपत गायकवाड यांच्यासह भाजप शहराध्यक्ष संजय मोरे, मनोज राय, मोरेश्वर भोईर हे पदाधिकारी उपस्थित होते.
लसींअभावी लसीकरण सतत बंद, नागरिकांचे हाल
- कल्याण-डोंबिवली महापालिकेत अनेकदा लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद पडते.
- कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी पुढे फैलाव होऊ नये यासाठी लसीकरण आवश्यक आहे.
- त्यात लसींच्या पुरेशा पुरवठ्याअभावी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
- त्यामुळे आमदार गायकवाडांनी प्रशासनावर हल्लाबोलही केला होता, पण आता तेच उपायही घेऊन आले आहेत.