मुक्तपीठ टीम
हे कुणी जाणीवपूर्वक केले आहे की काही वेगळ्या विचारांनी केले आहे हे लवकरच समोर येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीने मराठा विद्यार्थ्यांसंदर्भात जी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली त्यासंदर्भात बोलताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी जनता दरबार उपक्रमास उपस्थित होते त्यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.
एमपीएससी विद्यार्थ्यांसंदर्भात जी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे त्याबाबतची माहिती मिळाली असून कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली आहे. मुख्य सचिवांना ज्याकाही सूचना करावयाच्या होत्या त्या दिलेल्या आहेत. परंतु आज सकाळी माहिती मिळाली आहे की, ते प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे.
एमपीएससी ही स्वतंत्र व स्वायत्त संस्था आहे त्याबद्दल दुमत नाही. परंतु राज्यात मराठा आरक्षणाचा महत्वाचा विषय सुरू आहे त्यात सगळे लक्ष देत असतील तर साधारण या विचारापासून बाजुला जाण्याचा प्रयत्न इतरांनी करु नये आणि जर करायचाच असतं तर त्यांनी मुख्य सचिवांच्या कानावर घालू शकत होते. नाहीतर हे नवीन प्रश्न निर्माण झाले नसते. मात्र यातून योग्य तो मार्ग निघेल असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात संपूर्ण माहिती मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाशी चर्चा केल्यानंतर सांगितली आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.