मुक्तपीठ टीम
कोरोना लसींबद्दल उगाचच साशंक असणाऱ्यांच्या मनातील शंका दूर करणारी एक बातमी आहे. ही एक दिलासादायक बातमी आहे. कोविशिल्ड लस घेणाऱ्यांसाठी ही खूपच चांगली बातमी आहे. देशाच्या सशस्त्र दलांमधील १५ लाखांहून अधिक आरोग्य सेवा कामगार आणि फ्रंटलाईन कामगारांवर केलेल्या अभ्यासानुसार, कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना होण्याची शक्याता ९३ टक्क्यांनी कमी होत आहे.
देशात लसींच्या परिणामकतेवर झालेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा अभ्यास आहे. लस घेऊनही देशात कोरोनाचा संसर्ग दर सुमारे १.६% आहे. म्हणजेच, देशातील १००० लोकांपैकी १६ लोकांना पुन्हा कोरोना होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला लसीचे दोन्ही डोस मिळाल्यानंतर दोन आठवड्यांनंतरच त्या व्यक्तीचे पूर्णपणे लसीकरण झाले असे मानले जाते.
कोविशिल्ड लसंवतांवरील अभ्यास
- आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) चा हा अभ्यास लसवंतांवरील जगातील सर्वात मोठा अभ्यास आहे.
- संशोधकांनी म्हटले आहे की, आतापर्यंत केलेल्या सर्व अभ्यासाचा नमुना आकार हा १० लाखांपेक्षा कमी होता.
- लसीच्या परिणामकतेवरील जगभरातील सर्वात मोठ्या अभ्यासांपैकी एक आहे.
- कोविशिल्ड ही ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेकाच्या एझेडडी-१२२२ फॉर्म्युलेशनचा मेड इन इंडिया लस आहे.
- भारतात सुरू असलेल्या कोरोनाविरोधी लसीकरणातील प्रमुख लसींपैकी ही एक महत्वाची लस आहे.
या अभ्यासाच्या निकालांचा संदर्भ देत, नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल म्हणाले की, “हा अभ्यास १५ लाखांहून अधिक डॉक्टर आणि इतर फ्रंटलाइन वर्कर्सवर करण्यात आला आहे. ज्यांनी कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना ९३ टक्के संरक्षण मिळते, असे दिसून आले आहे.”
भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. ज्यामध्ये सशस्त्र दलातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि इतर फ्रंटलाइन वर्कर्सचे प्रथम लसीकरण करण्यात आले. हा अभ्यास ३० मे पर्यंत लसीकरण झालेल्या या १५ लाख कामगारांवर लसीच्या परिणामावर करण्यात आला.
अभ्यासात सहभागी लसवंत!
- यामध्ये १५,९५,६३० लोकांचे सरासरी वय २७ वर्षांपर्यंत होते. त्यापैकी ९९% पुरुष होते.
- १३५ दिवसांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या अभ्यासात सहभागी स्वयंसेवकांपैकी ३० मे पर्यंत ९५% लोकांना एकच डोस मिळाला होता.
- ८२% लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले होते.